HBD Shardul : धोनीच्या संघात आला आणि ‘लॉर्ड’ झाला, शार्दुलचा आतापर्यंत खडतर प्रवास जाणून घ्या…


पुणे : भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. जेव्हाही तो मैदानावर येतो, तेव्हा नक्कीच सामन्यात जादू घडल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या पालघरमधून आलेला हा खेळाडू आता टीम इंडियाचा प्राण बनला आहे. एकवेळ अशी होती की त्याला लठ्ठपणामुळे टोमणे ऐकावे लागले. आज तोच क्रिकेटपटू आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमत्कार करताना दिसत आहे. हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणी नसून शार्दुल ठाकूर आहे. आज त्याचा वाढदिवस आहे.
मुंबईपासून ८७ कि.मी. दूर असलेल्या पालघर हे त्याचं गाव. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी लोकल ट्रेनने तासनतास प्रवास करत तो मुंबई गाठायचा. त्याने २०१२-१३ मध्ये रणजी करंडक स्पर्धेतून पदार्पण केले आणि जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई संघाचा तो सदस्य होता. या काळात त्याचे वजन खूप जास्त होते. त्यामुळे बऱ्याचदा त्याला टोमणे ऐकावे लागत. त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचा निर्धार केला आणि पुढच्या सत्रात २७ विकेट्स घेतल्या. २०१४-१५मध्ये त्याने ४८ विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला भारत अ संघात स्थान मिळाले. विशेष गोष्ट म्हणजे शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा या दोघांनी दिनेश लाड यांच्याकडेच क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. लाड हे मुंबई क्रिकेटमधील प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत.

शार्दुलला प्रत्येकजण गोलंदाजीसाठी ओळखतो, पण त्याच्या नावावर फलंदाजीत एक अनोखा विक्रमही आहे. त्याने २००६ मध्ये शालेय स्तरावरील क्रिकेटमध्ये सलग सहा षटकार ठोकले होते. शार्दुलने २००६ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी हा पराक्रम केला होता. हॅरिस शील्ड प्लेट डिव्हिजन मधील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना त्याने डॉ. एस. राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध ही वादळी खेळी खेळली. या सामन्यात त्याने सहा विकेट्सही घेतल्या होत्या. याशिवाय २०१४ साली रणजी करंडक सामन्यात त्याने मुंबईसाठी १०० चेंडूत ८७ धावा केल्या. या खेळीमुळे मुंबई रणजी चॅम्पियन बनली होती.

शार्दुल ठाकूरने २०१७ मध्ये श्रीलंका दौऱ्यातून टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने कसोटी आणि टी-२० मध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केल्यानंतर, तो एकदा लोकल ट्रेनद्वारे आपल्या घरी गेला होता. सामान्य माणसाप्रमाणे तिकीट घेतल्यानंतर उभे राहून त्याने प्रवास केला होता. त्याचे कसोटी पदार्पण चांगले राहिले नाही, हॅमस्ट्रिंगमुळे १० चेंडू टाकल्यानंतरच त्याला मैदान सोडावे लागले, पण नंतर २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुन्हा कसोटी खेळली आणि भारताच्या विजयाचा नायक बनला. त्याने आतापर्यंत चार कसोटीत १४, १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ आणि २२ टी-२० मध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा एक भाग आहे.

आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण २०१५ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून झाले होते. त्याला पंजाबने २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते, पण त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली. पंजाब फ्रँचायझीने रामराम केल्यानंतर शार्दुल ठाकूरला रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०१७ च्या हंगामात त्याने आपल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. त्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढील सत्रात माघारी परतले. तेव्हा सीएसकेने शार्दुलला आयपीएल २०१८ च्या लिलावात २.६० कोटी रुपयांना खरेदी केले. शार्दुलने आतापर्यंत ६१ आयपीएल सामने खेळले असून ६७ विकेट्स घेतल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: