सीएसकेने अशी जिंकली आयपीएल २०२१ ची फायनल
आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. सीएसकेचे लीगमधील हे चौथे जेतेपद ठरले. केकेआर संघालाही त्यांचे तिसरे आयपीएल जेतेपद जिंकण्याची संधी होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ३ गडी बाद १९२ धावा केल्या. फाफ डु प्लेसिसने ८६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. याशिवाय रॉबिन उथप्पाने १५ चेंडूत ३१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी झटपट धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली, पण नंतरच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. त्याचा परिणाम असा झाला की, संघाला २७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
धोनीने सांगितला विजयाचा फॉर्मुला
अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे श्रेय धोनीने आपल्या खेळाडूंना दिले. तो म्हणाला की, आम्हाला प्रत्येक सामन्यासह एक नवीन सामना जिंकून देणारा खेळाडू मिळाला. आमच्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आम्हाला जोरदार पुनरागमन करायचे होते आणि तेच आम्ही केले. आमच्यासाठी प्रत्येक सरावाचे सत्र, बैठकीचे सत्र महत्वाचे होते. धोनीने यावेळी जगभरातील सीएसकेच्या चाहत्यांचे आभार मानले.