NCB चे समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा थेट हल्लाबोल; म्हणाले, आता उत्तर द्या!


हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांचा एनसीबीवर पुन्हा हल्लाबोल
  • तीन प्रकरणांमध्ये एकच पंच कसा?; मलिक यांचा सवाल
  • कोण आहे हा फ्लेचर पटेल? समीर वानखेडेंशी संबंध काय? – मलिक

मुंबई: कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नं केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप करत खळबळ उडवून देणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. एनसीबी ही तपास यंत्रणा भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून व मदतीनं कारवाया करते, स्वत:च बातम्या पेरून लोकांची बदनामी करते, असं सांगणाऱ्या मलिक यांनी एनसीबीवर आज आणखी एक आरोप केला आहे. (Nawab Malik questions NCB over Fletcher Patel)

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काही फोटो आणि तीन पंचनामे शेअर केले आहेत. हे फोटो फ्लेचर पटेल नामक एका इसमाचे आहेत. मुंबईत साजरा करण्यात आलेल्या कारगील शहीद दिवसाच्या कार्यक्रमातील हे फोटो आहेत. यात फ्लेचर पटेल हा व्यक्ती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत दिसत आहे. सन्मानचिन्ह देऊन वानखेडे यांचं स्वागत करताना दिसत आहे. हाच फ्लेचर पटेल एनसीबीनं तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांच्या प्रकरणात पंच आहे. संबंधित पंचनाम्याच्या प्रती सुद्धा माहितीसाठी मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकच व्यक्ती पंच कसा असू शकतो, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. ‘एनसीबीच्या सांगण्यानुसार त्यांचे पंच हे इंडिपेंडंट असतात, मग हा फ्लेचर पटेल कोण आहे? तो समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड कसा? वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकांसोबत त्याचे फोटो आहेत. वानखेडे यांचा फ्लेचर पटेलशी नेमका काय संबंध आहे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केली का? असा सवाल त्यांनी केला.
नियमानुसार घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांपैकी काहींना कुठल्याही कारवाईच्या वेळी पंच केले जाते. पण फ्लेचर पटेल हा एनसीबीच्या छाप्यांच्या वेळी नेमका तिथं कसा उपस्थित असतो? असे अनेक प्रश्न मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केले आहेत. मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये फ्लेचर पटेलचा एका महिलेसोबतचा फोटो शेअर केला आहे. संबंधित महिलेला त्यानं ‘लेडी डॉन’ असं म्हटलं आहे. ही ‘लेडी डॉन’ कोण आहे,’ असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. ‘माझ्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. त्यामुळे आता उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
हेही वाचा:

‘दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची, आता…’

ब्राझीलमधील दुष्काळाचा भारताला होऊ शकतो ‘असा’ फायदा

मनोहर जोशी प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रामदास कदमांची दसरा मेळाव्याकडे पाठ?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: