हायलाइट्स:
- महागाईच्या दिवसांत ग्राहकांना मिळालं मोफत अतिरिक्त पेट्रोल
- पेट्रोल पंप मालकाच्या दिव्यांग भाचीला कन्यारत्न
- ग्राहकांना १० टक्के पेट्रोल मोफत देण्याची घोषणा
मध्य प्रदेशातील बैतूलचे रहिवासी असलेले पेट्रोल पंप संचालक राजेंद्र सेनानी यांना आपल्या दिव्यांग भाचीला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर अतिशय आनंद झाला. आपला आनंद इतरांशीसोबत वाटण्यासाठी सेनानी यांनी चक्क ग्राहकांना १० टक्के पेट्रोल मोफत देण्याची घोषणा केली.
राजेंद्र सेनानी यांच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान १० टक्के अधिक पेट्रोल देण्यात आलं. स्वत: पेट्रोल पंप मालक राजेंद्र सेनानी यांनी ही माहिती दिली.
आपले दिवंगत बंधु गोपाळदास सेनानी यांची मुलगी शिखा ही जन्मापासूनच दिव्यांग आहे. शिखाला बोलता – ऐकता येत नाही. भावाचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र सेनानी यांनीच आपल्या भाचीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या भाचीचा विवाहही मोठ्या धुमधडाक्यानं लावून दिला. शिखा हिचा पतीही दिव्यांग आहे. तो भोपाळमध्ये नोकरी करतो. नुकतंच, सेनानी यांची दिव्यांग भाची शिखा हिनं एका मुलीला जन्म दिला. यामुळे राजेंद्र सेनानी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या इटारसी रोडवरील सर्व्हिस पेट्रोल पंपावर १३, १४ आणि १५ ऑक्टोबर असे तीन दिवस सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत दाखल होणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला अतिरिक्त पेट्रोल मोफत देण्याची घोषणा सेनानी यांनी केली होती. या योजनेंतर्गत ग्राहकांना १०० रुपयांच्या पेट्रोलवर ५ टक्के आणि २०० ते ५०० रुपयांच्या पेट्रोलवर १० टक्के अतिरिक्त पेट्रोल देण्यात आलं.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पेट्रोल पंपावर ग्राहकांनीही मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. तसंच अनेक ग्राहकांनी पेट्रोल पंप माल सेनानी यांच्या या अनोख्या संकल्पनेचं कौतुकही केलं.
शिखा दिव्यांग असल्यानं तिला मूल झाल्यानंतर हे क्षण स्मरणीय बनवण्याचा निर्णय आपण घेतला होता. नवरात्रीच्या दिवसांत ९ ऑक्टोबर रोजी शिखा हिला कन्यारत्न प्राप्त झाल्यानं संपूर्ण कुटुंबच आनंदात न्हावून गेलं. मिठाईचं वाटप करतानाच पेट्रोल पंपावर ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्नही सेनानी कुटुंबानं केला.