टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का; प्रशिक्षकांनीच दिला राजीनामा


इस्लामाबाद : न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ग्रँट ब्रँडबर्न यांनी पाकिस्तानच्या उच्च कामगिरी प्रशिक्षकपदाचा (High performing coaching) राजीनामा दिला आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित होते. न्यूझीलंडचे माजी कसोटी फिरकीपटू असलेल्या ब्रँडबर्न यांनी सप्टेंबर २०१८ ते जून २०२० या कालावधीत पाकिस्तानी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांनी कोचिंगच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात ब्रँडबर्न म्हणाले की, “पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मी सुवर्ण आठवणी आणि एक अद्भुत अनुभव घेऊन निरोप घेत आहे.” ग्रँट ब्रँडबर्न १९९० ते २००१ दरम्यान ऑफ स्पिनर म्हणून न्यूझीलंडकडून खेळले आहेत. त्यांच्या नावावर सात कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने आहेत. ते न्यूझीलंड अ आणि न्यूझीलंड अंडर-१९ संघांचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

रमीज राजा यांनी पीसीबीच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यापासून पद सोडणारे ब्रँडबर्न हे पाचवे सर्वोच्च अधिकारी आहेत. या आधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक, गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस, मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान आणि विपणन प्रमुख बाबर हमीद यांनी राजीनामा दिला आहे. ब्रँडबर्न म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलमुळे कुटुंबासोबत वेळ घालवू शकलो नाही. माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करताना खूप त्याग केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात येऊन येथील प्रेम आणि मैत्रीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अनेक आव्हाने होती. मला आता माझ्या कुटुंबाला प्राधान्य देण्याची आणि पुढील कोचिंगच्या आव्हानाकडे जाण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानातील सर्व उच्च कार्यक्षमता केंद्रांचे मानक उंचावण्याची जबाबदारी पीसीबीने त्यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर हाय परफॉर्मन्सचे संचालक नदीम खान म्हणाले, “ग्रँटने उत्कटतेने आणि समर्पणाने पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली. तो नेहमी उत्साहाने परिपूर्ण होता आणि त्याच्याकडे नवीन कल्पना होत्या. यातील अनेक गोष्टी त्यांनी अंमलातही आणल्या. ग्रँटने पाकिस्तान क्रिकेटमध्ये दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्याचे आभार मानतो.”

रमीज राजांमुळे बदलाचे वारे
येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेक वरिष्ठ पदांवरील अधिकारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डातून राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रमीज राजा यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान क्रिकेट सुधारण्यासाठी आणि बोर्डात बदल घडवून आणण्यासाठी ते स्वतःची ब्लू प्रिंट लागू करतील. वरिष्ठ पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करण्याबाबतही त्यांनी सांगितले. पाकिस्तान बोर्डाने अलीकडेच नवीन सीईओसाठी अर्ज मागवले आहेत. पण जुने सीईओ वसीम खान यांच्यापेक्षा कमी पगार नव्या सीईओंना देण्यात येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: