हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
- दसरा मेळाव्यातील भाषणात जोरदार टीका
- महाराष्ट्रातील घटनांवरून टीका करणाऱ्यांवर पलटवार
‘महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून होत आहे, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? साकीनाका अत्याचार प्रकरणी राज्यपालांनी पत्र लिहिलं. आमच्या माता भगिनींचा सन्मान आमच्यात आहे. बलात्कार करणाऱ्याला फासावर लटकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे आणि उत्तर प्रदेशात काय सुरु आहे? २६ नोव्हेंबर रोजी ज्यांनी बलिदान दिले त्या पोलीस खात्याला माफिया म्हणणं चूक आहे. उत्तर प्रदेशातील पोलीस काय भारतरत्न आहेत का?’ असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला.
मोदी सरकारवर घणाघाती टीका
‘काहींच्या घरी २४ तास शिमगा आहे. महाराष्ट्र सत्तेला नव्हे सत्याला जगणारा आहे. सावरकर आणि गांधी चिरकुट वाद घालणाऱ्यांनी देशासाठी काय केले? त्यांचे स्वातंत्र्य काळात योगदान नाही. महिला अत्याचार, संघराज्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केलं आहे. आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी हे बंद करावं,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.