‘भगव्या ध्वजाचे राजकारण करणार नाही, करू देणार नाही’


हायलाइट्स:

  • खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर फडकला भगवा स्वराज्य ध्वज
  • हा ध्वज महाराष्ट्रातील तमाम जनतेचा – रोहित पवार
  • भगव्या ध्वजाचे राजकारण करणार नाही – रोहित पवार

अहमदनगर: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर देशातील सर्वाधिक उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर फडकविण्यात आला. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ७४ मीटर उंचीच्या या ध्वजाची स्थापना करण्यात आली. संत महंत आणि राज्यभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान युवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र, या ध्वजावरून पवार यांच्यावर राजकारण करीत असल्याची टीका सुरू झाली आहे. या कार्यक्रमात बोलताना आमदार पवार यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ‘भारतातील सर्वांत उंच भगवा स्वराज्य ध्वज हा पक्षाचा नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आहे. या भगव्या ध्वजाचे राजकारण मी करणार नाही व होऊही देणार नाही,’ असे पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

या कार्यक्रमासाठी कोणाही राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते. कारगील युद्धात पुत्र हुतात्मा झालेल्या वीर माता अनुराधा गोरे यांच्या हस्ते ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. त्यानंतर देशातील ९६ ठिकाणांहून आणलेल्या मातीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भव्य भगवा ध्वज उंच ध्वजस्तंभावर लावण्यात आला. यावेळी आमदार पवार यांच्यासह अखिल भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले गुरूजी, बीजमाता राहिबाई पोपेरे, लोककलावंत मंगला बनसोडे, वीरमाता अनुराधा गोरे, गायक अवधूत गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या भगव्या स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास ९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत झाला. १२ हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, देशातील ६ राज्यांचा प्रवास करत हा ध्वज दसऱ्याच्या मुहुर्तावर खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर फडकविण्यात आला.

वाचा: ‘पवारांनी लायसन्स नसलेल्या ड्रायव्हरला थेट व्होल्वो बस चालवायला दिली’

या कार्यक्रमाला कोणकोण राजकीय नेते उपस्थित राहणार, कोण काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये, यासाठी कोणाही राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. राज्यभरातून आलेल्या कर्तृत्ववान युवांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. स्वराज्य ध्वज ९६ तीर्थ स्थळावर नेण्यात आला होता. तेथून आणलेल्या मातीचेही यावेळी पूजन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

यावेळी बोलताना पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘एकता व समानतेच्या विचाराने जातीभेद व धर्मभेद विसरून आपण येथे स्वराज्य ध्वजाला मानवंदना देण्यासाठी आलो आहोत. स्वराज्य ध्वज हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या ताकदीचे प्रतीक आहे. मला या यात्रेतून प्रसिद्धी मिळवायची नाही. प्रसिध्दीसाठी या यात्रेत मी सहभागी झालो नाही. भगवा ध्वज सर्वांसाठी आहे. ज्या ज्या परिसरात धार्मिक स्थळांवर, शौर्य स्थळांवर हा ध्वज गेला तेथे सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिकांनी या ध्वजाचे स्वागत केले. याचा मला अभिमान वाटतो. या यात्रेत केवळ ध्वजाला महत्त्व हा विचार मला पुढे न्यायचा आहे’, असेही पवार म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: