हायलाइट्स:
- युरीन संक्रमणाचा त्रास जाणवल्यानंतर बिल क्लिंटन रुग्णालयात दाखल
- बिल क्लिंटन अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष
- १९९३ ते २००१ या काळात हाताळली राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी
७५ वर्षीय बिल क्लिंटन यांना कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. युरीन संक्रमणामुळे ‘कॅलिफोर्निया मेडिकल विवि इरविन मेडिकल सेंटर’च्या आयसीयू विभागात क्लिंटन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बिल क्लिंटन यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना हृदयविकार किंवा कोविडशी निगडीत कोणतीही समस्या नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
बिल क्लिंटन यांच्या खासगी डॉक्टर लिसा बार्डेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणामुळे क्लिंटन यांना आयसीयू विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती ठीक आहे तसंच ते आपल्या कुटुंबाशी आणि कर्मचाऱ्यांशी संवादही साधत आहेत.
रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, दोन दिवस अँटिबायोटिक औषधांच्या उपचारानंतर परिणाम दिसून येत आहेत. कॅलिफोर्नियाची एक मेडिकल टीम माजी राष्ट्राध्यक्षांच्या न्यूयॉर्क स्थित मेडिकलच्या टीमच्या संपर्कात आहे. बिल क्लिंटन लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी आशाही डॉक्टरांनी व्यक्त केलीय.
या वयात मूत्रसंबंधी संक्रमण ही सामान्य गोष्ट आहे तसंच त्यावर सहज उपचारही उपलब्ध आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत बिल क्लिंटन यांना डिस्चार्ज मिळू शकेल, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय.
बिल क्लिंटन यांनी अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून १९९३ ते २००१ या काळात जबाबदारी हाताळली. त्यानंतर बिल क्लिंटन यांना अनेकदा प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करावा लागला आहे. दीर्घकाळ छातीत दुखणं आणि श्वासोच्छवासात अडथळ्याची समस्या जाणवल्यानं २००४ साली त्यांच्यावर बायपास शस्रक्रिया पार पडली होती. २००५ मध्ये फुफ्फुसांचा त्रास जाणवत असल्यानं ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर २०१० साली त्यांच्या कोरोनरी आर्टरीमध्ये स्टेंटची एक जोडी लावण्यात आली. आता, २०२१ मध्ये त्यांना मूत्र संक्रमण संबंधीत समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल व्हावं लागलंय.