करोनामृत्यूंवरून वादंग; जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन काँग्रेसची टीका; काय आहे प्रकरण?


वृत्तसंस्था/टाइम्स वृत्त

अवघ्या जगाला जेरीस आणणाऱ्या करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने यशस्वी प्रयत्न केल्याचा व देशातील लसीकरणाचा वेगही अनेक देशांच्या तुलनेत जास्त असल्याचे केंद्र सरकारने अनेकदा म्हटले आहे. मात्र, सरकारची करोनामृत्यूंसंबंधी अधिकृत आकडेवारी व जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जाहीर करण्यात आलेली मृत्यूसंख्या यात प्रचंड तफावत असल्याचे समोर आले आहे. यावरून काँग्रेसने केंद्राला पुन्हा लक्ष्य केले आहे, तर करोनामृत्यू मोजण्याची ‘डब्ल्यूएचओ’ची कार्यपद्धतीच चुकीची असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

‘केंद्राच्या निष्काळजीमुळे ४० लाख करोनामृत्यू’

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निष्काळजीमुळे करोनाकाळात सुमारे ४० लाख भारतीयांचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. तसेच करोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये भरपाई देण्याच्या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील एका वृत्ताचा स्क्रीनशॉट राहुल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून जगभरातील करोनामृत्यूंचा आकडा खुला करण्यास भारताचा विरोध होता, असा दावा यात करण्यात आला आहे.

‘मोदीजी स्वतः खरे बोलत नाहीत व इतरांनाही बोलू देत नाहीत. ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे एकही मृत्यू झाला नाही, असे खोटे ते आजही बालतात’, असे ट्वीट राहुल यांनी या स्क्रीनशॉटसोबत केले आहे. ‘सरकारच्या निष्काळजीमुळे पाच लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाल्याचे मी याआधीही म्हटले आहे. तुमची जबाबदारी पार पाडा. मोदीजी, करोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये द्या’, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आत्तापर्यंत पाच लाख २१ हजार ७५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारने करोनामृत्यूची खरी आकडेवारी जाहीर केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

‘डब्ल्यूएचओ’च्या पद्धतीवर भारताचा आक्षेप

नवी दिल्ली : देशातील करोनामृत्यूंचे अनुमान लावण्याच्या ‘डब्ल्यूएचओ’च्या पद्धतीवर भारताने शनिवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. करोनामृत्यूंचे अनुमान करण्यासाठीची गणितीय पद्धत ही अवाढव्य आकारमान आणि लक्षणीय लोकसंख्या असलेला भारतासारखा देश आणि लहान देश यांच्यात एकसारखी असू शकत नाही, असे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

जगभरातील करोनामृत्यूंची संख्या खुली करण्यास भारताचा विरोध होता. त्यामुळे जगभरातील करोनामृत्यूंची आकडेवारी जाहीर करण्यास काही महिने विलंब झाला, असा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने १६ एप्रिलच्या अंकात केला होता. या वृत्तानुसार २०२१अखेरपर्यंत जगभरात सुमारे दीड कोटी नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या देशांनी वैयक्तिकरित्या जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या दुप्पट आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या आकडेवारीनुसार भारतात ४० लाख नागरिक करोनामुळे दगावले आहेत. हा आकडा देशातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत मृत्यूसंख्येच्या जवळपास आठपट आहे. भारताचा मूळ आक्षेप करोनामृत्यूंच्या संख्येवर नसून, ते मोजण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीवर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.