बहिणीला सासुरवास असता तर भावाला बोलली असती!; पंकजांबद्दल ‘हा’ नेता म्हणाला…


हायलाइट्स:

  • बहिणीला सासुरवास असता तर भावाला बोलली असती.
  • पंकजा मुंडे यांच्याबाबत महादेव जानकर यांचे विधान.
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्याकडेही वेधले लक्ष.

अहमदनगर : ‘बहिणीला सासुरवास असला तरी ती प्रथम भावाला आणि वडिलांना सांगते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपण बहीण मानलेले आहे मात्र, आपण जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो, त्यावेळी त्या हसत हसत समोर येतात. याचा अर्थ त्यांना भाजपमध्ये त्रास होत नसावा. जर तसा त्रास झाला आणि त्यांनी माझ्याकडे तक्रार केली तर भाऊ म्हणून पुढे काय करायचे ते पाहू,’ असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले. ( Mahadev Jankar Pankaja Munde Latest News )

वाचा: ‘पवारांचा तो आरोप हास्यास्पद; ५० वर्षे राजकारणात असूनही…’; पाटलांची टीका

महादेव जानकर नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत का, या संबंधी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. त्यामुळे पक्ष कोणताही असला तरी राजकारणाच्या पलीकडे माझे आणि पंकजा यांचे भावाबहिणीचे नाते टिकून आहे. त्या भाजपमध्ये नाराज आहेत असे मला वाटत नाही. त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले आहे. पक्षाच्या कार्यक्रमांत इतर नेत्यांसोबत त्या सहभागी होत आहेत. त्यांना जर पक्षातून त्रास असता, अडचण असती तर त्या मला नक्कीच बोलल्या असत्या. यापुढेही त्या जेव्हा सांगतील की त्रास होत आहे, तेव्हा भाऊ म्हणून मी त्यांना पुढे काय करायचे ते सांगू शकेन.’

वाचा:गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ या विधानावर जानकर यांनी मतप्रदर्शन केले. ‘फडणवीस सध्या विरोधी पक्ष नेते आहेत. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याचा प्रोटोकॉल जवळपास सारखाच असतो. शिवाय फडणवीस यांचे अधिकाऱ्यांशी चांगले संबध आहे. अधिकारीही त्यांचे ऐकतात, त्यामुळे कदाचित त्यांना तसे वाटत असेल’, असे जानकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांवरील छाप्यांसंबंधी जानकर म्हणाले की, ही कारवाई अद्याप सुरू आहे. त्यामुळे यावर राजकीय नेत्यांनी बोलले तर अधिकाऱ्यांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आताच यावर काही बोलणे योग्य नाही. मात्र, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली आहे. तरीही अशी सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये आणि काही चुकीचे केले नसेल तर या कारवाईला कोणी घाबरण्याचीही गरज नाही. राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल जानकर म्हणाले, ‘हे सरकार सत्तेवर आल्यानंतर करोनाचे संकट आले. या काळात लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे होते. त्यामुळे सरकारच्या एकूण कामाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. वातावरण निवळल्यानंतर त्या येतील. मात्र, विकासाच्या बाबतीत सरकार गोंधळेलेले आहे, हे दिसून येते.’

वाचा:‘राजू शेट्टींच्या मिशीला बारामतीचे खरखटे!’; ‘या’ आमदाराची बोचरी टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: