हायलाइट्स:
- महागाई कमी झाल्याचा केंद्र सरकारचा दावा
- शिवसेनेनं उडवली सरकारी दाव्याची खिल्ली
- महागाईची जुमलेबाजी तरी करू नका – शिवसेनेचा टोला
ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घटला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५.३ टक्के होता. आता तो ४.४५ टक्क्यांवर आला आहे. सरकारच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस’नं ही टक्केवारी जारी केली आहे. एप्रिल २०२१ नंतरचा हा सर्वात कमी दर आहे, असंही सांगण्यात आलं आहे. शिवाय खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत असाही सरकारचा दावा आहे. त्यामुळं खाद्य महागाई ३.११ टक्क्यांवरून ०.६८ टक्के एवढी घसरली आहे, असंही सरकारचं म्हणणं आहे. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारला टोले लगावण्यात आले आहेत.
वाचा: हे कसं घडलं? जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात
‘पोटाची खळगी कशी भरायची, करोनाच्या संकटात दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे. सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ९.५ टक्के दरानं वाढणार, असं आणखी एक ‘गाजर’ दाखवलं आहे. सरकारी कागदावर आकड्यांची तलवारबाजी नेहमीच सुरू असते. पण सरकारी माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात अनेकदा जमीन-अस्मानाचा फरक असतो,’ असं सांगत शिवसेनेनं सध्याचं वास्तवच मांडलं आहे.
वाचा: ‘उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाहीत, ते घराबाहेर पडणार नाहीत हे लोकांनी गृहितच धरलंय’
‘पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज नवनवे विक्रम करीत आहे. स्वयंपाकाचा गॅसदेखील या दरवाढीच्या शर्यतीत मागे नाही. पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही आता प्रति लिटरमागे शंभरी ओलांडली आहे. घरगुती गॅसचे दर मजल-दरमजल करीत एक हजार रुपयांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आता बुधवारपासून वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांतील ही दुसरी आणि आठ महिन्यांतील पाचवी दरवाढ आहे. म्हणजे पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरवाढीचे सत्रदेखील सुरूच आहे. इंधन दरवाढीमुळं बाजारात सर्वच वस्तूंचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत. सामान्य माणसाचं त्यामुळं कंबरडं मोडलं आहे आणि सरकार महागाई घटल्याचं सांगतंय. असं असेल तर मग बाजारात जी दरवाढ आणि महागाई दिसते आहे ते काय आहे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘सध्याच्या इंटरनेट मायाजालाच्या भाषेत हा महागाईचा वणवा ‘आभासी’ आहे आणि लोक, विरोधी पक्ष उगाच त्याचा बागुलबुवा उभा करीत आहेत असं केंद्रातील सरकारला म्हणायचं आहे का?,’ असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.