शिक्षण क्षेत्रातले अवलिया – आटपाडीचे जे.जी.पत्की सर
जयराम गणेश पत्की तथा आम्हां सर्वांचे जे.जी पत्की सर वृद्धापकाळाने हे जग सोडून गेल्याच्या वार्तेने मन दुःखी सुन्न झाले . जीवसृष्टीत येणारा प्रत्येक जण जाणारच आहे हे त्रिकालाबाधीत सत्य आहे,तथापि जाणारी व्यक्ती सदाबहार , समाजाभिमुख, हसतमुख, अजातशत्रु आणि जनप्रिय असेल तर त्यांचे जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून जाते .अशाच लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्वाच्या पत्की सरांच्या जाण्याने मन दुःखी झाले .
१९७८ - ७९ हे साल असावे मी राजारामबापू हायस्कुलमध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश घेतला होता.१९८२ ला दहावी पास होऊन बाहेर जाईपर्यत राजारामबापू हायस्कुलमधील प्रत्येक शिक्षक शिक्षिकेत आम्हांला आमचे माँ - बापच अनुभतीत यायचे . इतकं निरलस, निर्व्याज प्रेम राजारामबापू हायस्कुल च्या त्यावेळच्या सर्व परिवाराने दिले.त्यामध्ये पत्की सरांचेही पहिल्या चौघात गणले जाईल इतके आपुलकीचे स्थान होते चेहऱ्यावरील सततची हास्यमुद्रा,सर्वांना हात उंचावून दाद देण्याची,संवाद साधण्याची अलौकीक खुबी, प्रसंगी कर्तव्य कठोर बनणारे आणि काही क्षणातच पुन्हा पुर्वपदावर येत देवआनंद स्टाईलची सदाबहार हास्यमुद्रा प्रकट करणारे पत्की सर शेकडो विद्यार्थी - विद्यार्थीनीचे आदर्श होते .
त्यावेळचे मुख्याध्यापक दिवंगत एम .बी . कुलकर्णी सर, एम.व्ही.देशमुख सर, रविंद्रनाथ उर्फ खंडा देशपांडे सर,आप्पासाहेब काळेबाग सर, डी.एम .पाटील सर, मधुकर जाधव सर, सुभाष माडगूळकर सर ,एनजी ऐवळे सर,बी बी कुलकर्णी सर ,व्ही के देशमुख सर, व्ही एम देशमुख सर, कमल कुलकर्णी तथा राधीका जोशी मॅडम ,तारा चव्हाण मॅडम आणि उपमुख्याध्यापक पत्की सर आणि इतर शिक्षक कर्मचाऱ्यांची एकसंघ, एकजीव आणि अभेद्य टीम सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीसाठी दुसरे घरच होती . प्रत्येकाने विद्यार्थी विद्यार्थीनीत आपली स्वतःची मुलेच पाहिली . जात पात ,उच्च नीच ,गरीब श्रीमंत या शृंखलेचा लवलेश ही राजारामबापू मध्ये कधी दिसला नाही ,शिवला नाही . दलित मुस्लीम, गरीबांच्या मुलांनाही आपल्या घरादाराची, मनाची कवाडे सताड उघडी ठेवणाऱ्या या सर्वांमध्ये पत्की सरांचे व्यक्तीमत्व खुप वरच्या श्रेणीचे होते. अडलेल्या नडलेल्या विद्यार्थ्यासाठी माँ बनणाऱ्या पत्की सरांनी अनेकांना केलेली मदत या कानाची त्या कानाला कळत नसे . जाता जाता सहजच हातात खावू टेकवून पुढे जाणारे पत्की सर विद्यार्थ्यासाठी माँ - माऊली - आईच होते .
राजारामबापू हायस्कुलमधून बाहेर पडल्या नंतरच्या ३८ वर्षात गाठ पडेल तिथे आस्था , आपुलकी, वडिलकीने विचारपुस करणारे, माझी एकादी बातमी, कृती, अथवा माझे एखादे भाषण, माझा झालेला सन्मान याबाबत मनमुराद बोलणारे , हाताला धरून जवळच्या हॉटेलात नेऊन चहा नाष्टा देणारे पत्की सर निरागस अवलियाच भासत . पत्की सर आणि हायस्कूल मधल्या इतर सगळ्या शिक्षकांच्या इन्सानियतच्या शिक्षणाने, अंर्तबाहय दैवी वागण्याने, हजारो समाजाभिमुख,समाजप्रिय विद्यार्थी तयार झाले . इंजिनियर विद्या ,डॉक्टर विनय ही पत्की सरांची मुले आपल्या सेवेतून समाजातील सर्वच घटकांना उपयोगी पडत आहेत . प्रशालेतल्या आणि परिवारातल्या संस्काराच्या शिदोरीने पत्की भावंडा सारखे हजारो विद्यार्थी जग कवेत घेत आहेत . आताच्या निर्ढावलेल्या जगात विद्या -विनय सारखे रात्रंदिवस समाजाला उपयोगी पडणारे राजारामबापू परिवारातले विद्यार्थी सर्वत्र आपली छाप पाडताहेतच तथापि संकटग्रस्तानां, अडचणीतल्या दीन दुबळ्यांना मदतीस आल्यानंतर त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, अंतकरणात उठणारे कृतज्ञतेचे भाव, प्रशाला आणि सर्वच शिक्षकांबरोबर त्या विद्यार्थ्याला लाख लाख दुवाँ देऊन जातात . पत्की सरांपासून सर्वांचे संस्कार मिळालेला सर्वांचाच राजू अर्थात एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक आटपाडीचे सुपुत्र राजीव खांडेकरांचे एकूण निरागस , सर्वगुण संपन्न, प्रसन्न व्यक्तीमत्व, त्यांचे जीवन,क्षणा क्षणाला आपल्या दोन्ही परिवाराच्या एक म्हणजे घरच्या आणि दुसऱ्या राजारामबापू परिवाराच्या संस्काराची आठवण करून देते . समाजातल्या सर्वांना आपलेसे करणारा ,सर्वांप्रति आस्था, आपूलकी ठेवणारा आणि कर्तृत्व संपन्न प्रत्येकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारा राजू (राजीव खांडेकर ) हा राजारामबापूच्या हजारो विद्यार्थ्यांचे मुर्तीमंत प्रतिकच आहे . राजारामबापू हायस्कूल मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रेमाची, आपुलकीची, राजू सारखे अनेक जण मोठी पहचान आहेत . पत्की सर, एम बी के सर, बी बी के सर ,कमल मॅडम ही शिक्षक मंडळी एकमेकांचे शेजारी असल्याने विद्यार्थ्यांसाठी यांची घरे दुसरी शाळाच असे . इतके निकोप वातावरण ठेवणारामध्ये पत्की सर अग्रभागी असत . प्रशालेत वात्रट, डांबरट वागणाऱ्या विद्यार्थ्यांला यथेच्छ चोप देण्यात पत्की सर अग्रेसर असत .तो विद्यार्थी कोणाचा का असेना पत्की सर जसे भेदभाव न करता भरभरून प्रेम करत तसेच डांबीस वागणाऱ्याला भेदभाव न करता मनमुराद चोप देत . कोणत्याही शिक्षकांनी चोपल्याची विद्यार्थ्यांनी आपल्या घरी तक्रार केल्यास घरच्यांकडूनही आणखी यथेच्छ चोप देवून राजारामबापू च्या शिक्षकांवर मोठा विश्वास व्यक्त केला जात असे . इतक प्रेम त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या प्रशालेतल्या सर्वांवर केले . वर्गात शिकविताना तल्लीन होऊन जाणारे, अभ्यासात सर्वात मागे असणाऱ्याला समजे उमजेपर्यत पुनः पुन्हा शिकविणाऱ्या राजाराम बापू परीवारातल्या शिक्षकांमुळे विध्यार्थ्यांना शिकवणी गाईड वगैरे एक्स्ट्रा शिक्षणाची कधी गरज भासली नाही असे ज्ञानदान करणारांमध्ये पत्की सर उठून दिसत .
भल्या पहाटे उठून श्री कल्लेश्वर मंदिरातल्या कीर्तन भजन आरती ला उपस्थित राहणारे, अनेक वेळा या भजनी भावीकांना चहा नाष्टा देणारे, गावातून फेर फटका मारताना मोठ्या आवाजात हाक देत, हात उंचावत सर्वांप्रति आदरभाव व्यक्त करणारे पत्की सर यापुढच्या काळात जरी दिसणार नसले तरी पत्की सर व अन्य शिक्षकांच्या संस्कारातून साकारलेले हजारो विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या कृतीतून या प्रत्येक शिक्षकांबरोबरच पत्की सरांची अनुभती - आठवण वर्षानुवर्षे जागवत राहतील यात तीळमात्र शंकाच नाही . आई-बाप - भाऊ - बहिण - दोस्त अशा सर्वच रुपात भेटलेल्या या अवलिया पत्की सरांच्या पवित्र आत्म्यांस करोडो प्रणाम, भावपूर्ण श्रद्धांजली .
सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि .सांगली प्रदेश महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य.