आर्यन खानला जामीन, की तुरुंगच?; बुधवारी फैसला होण्याची शक्यता


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळणार की त्याचा तुरुंग मुक्काम वाढणार हे उद्या, बुधवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन बुधवारी सुनावणी ठेवली.

न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावणीच्या अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावरून ८ ऑक्टोबरला आर्यनसह आरोपी अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर आर्यनने ज्येष्ठ वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल केला. अरबाझ व मुनमुन यांच्यासह नुपूर सतिजा व मोहक जयस्वाल या आरोपींनीही जामीन अर्ज दाखल केले. ‘आर्यनकडून कोणतेही अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले नाही आणि त्याच्याविरोधात काहीच आक्षेपार्ह नाही. त्याचे जबाबही तपास अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे. तरीही तो आठ दिवसांपासून कोठडीत आहे. त्याला आणखी दिवस कोठडीत ठेवण्याची गरज काय? एनसीबी या प्रकरणात खूप तपास करत आहे आणि नवनव्या अटका होत आहेत, हे खरे आहे. परंतु, आर्यनला जामीन दिल्याने त्यांचा तपास थांबणार नाही. त्याच्याकडून काहीच प्रतिबंधित अमलीपदार्थ हस्तगत झाले नसताना त्याला आणखी कोठडीत ठेवणे योग्य नाही’, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मांडला. तसेच आर्यनच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, त्याला एनसीबीतर्फे अॅड. ए. एम. चिमलकर व अॅड. अद्वैत सेठना यांनी विरोध दर्शवला.

‘देसाई यांच्या म्हणण्यासारखे या प्रकरणात असे काही गुलाबी चित्र नाही. तपासातून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यामुळे आर्यनच्या जामिनावरील सुटकेने तपासावर काही परिणाम होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात कटाचाही भाग आहे. त्यामुळे अर्जाला उत्तर दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी द्यावा’, असे म्हणणे चिमलकर यांनी मांडले. ‘हे महत्त्वाचे प्रकरण असून अन्य काही आरोपींच्या जामीन अर्जाच्या प्रती आम्हाला रविवारीच मिळाल्या आहेत. त्यामुळे उत्तर दाखल करण्यासाठी एक आठवडा द्यावा’, अशी विनंती अद्वैत सेठना यांनीही केली. मात्र, ‘आर्यनच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न आहे’, असे म्हणत प्रत्येक आरोपीवर वेगवेगळे आरोप असल्याने न्यायालयाने त्यांच्या अर्जांवर वेगवेगळी सुनावणी घ्यावी, अशी विनंती देसाई व मानेशिंदे यांनी केली. नुपूर सतिजातर्फे अॅड. अयाझ खान यांनीही लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. अखेरीस या प्रकरणात आर्यनच्या अर्जापासून सुनावणी सुरू करू, असे संकेत देत आणि एनसीबीला प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत न्या. पाटील यांनी बुधवारी सकाळी सुनावणी ठेवली. दरम्यान, या प्रकरणात सोमवारी अटक झालेला आणखी एक परदेशी नागरिक व पूर्वी एका परदेशी नागरिकासह अटक झालेल्या अन्य पाच जणांना न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: