Maharashtra Bandh: संपूर्ण महाराष्ट्रात महाआघाडी एकदिलाने रस्त्यावर उतरली, ‘या’ शहरात मात्र…


हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
  • नगर शहरात मात्र अल्प प्रतिसाद, आघाडीत बेदिली
  • राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं स्वतंत्र आंदोलन

अहमदनगर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला (Maharashtra Bandh) नगर जिल्ह्यात (Ahmednagar) अल्प प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात हे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले असले तरी नगर शहरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र आंदोलन केले, याचीही चर्चा होती. संगमनेर आणि कर्जत-जामखेडमध्ये मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

आजचा बंद मध्यरात्रीपासूनच सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नगर शहरासह जिल्ह्यातील दुकाने सकाळीच नेहमीच्या वेळेप्रमाणे उघडली. आधीच करोनामुळे व्यवसाय बुडाला असून सणासुदीत बंद ठेवणे शक्य होणार नाही, अशी व्यापाऱ्यांची भूमिका होती. त्यामुळे नेत्यांनीही आग्रह धरला नाही. सकाळी कोणी बाजारात येऊन व्यापाऱ्यांना तसे आवाहनही केले नाही. संगमनेरमध्ये मात्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरी काढली. त्यामुळे तेथे दुपारपर्यंत दुकाने बंद होती. कर्जत-जामखेडमध्येही बऱ्यापैकी बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वत: होऊन बंदमध्ये सहभागी घेत चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.

नगर शहरात मात्र, अल्प प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे येथे महाविकास आघाडीत एकी पहायला मिळाली नाही. आधीच दोन स्वतंत्र आंदोलनांची घोषणा झाली होती. शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्र येत सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर उपस्थित होते.

वाचा: ‘महाराष्ट्रात बंद करायचं शिवसेनेच्या मनात नव्हतं, पण…’

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर स्वतंत्ररित्या आंदोलन करण्यात आले. लखीमपूर घटनेतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, अरविंद शिंदे, बाळासाहेब जगताप, उबेद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कर्जतमध्येही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अशीच आंदोलने ठिकठिकाणी झाली.

वाचा: शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल

नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यात बारापैकी राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. शिवाय एक विधान परिषद सदस्यही आहेत. काँग्रेसचे दोन, तर शिवसेनाचा एक आमदार आहे. आघाडी सरकारमधील तीन मंत्री नगर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात बंदची स्थिती काय, असेल याकडे लक्ष लागले होते.

दुसरीकडे बंदमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ नये, यासाठी भाजपतर्फे सोशल मीडियातून मोठी मोहीम राबविण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाल्याचा दावा आता पक्षाकडून केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात बंदला अजिबात प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा केला आहे.

वाचा: मोदी सरकारनं राजकारणातली माणुसकीच संपवून टाकलीय: सुप्रिया सुळेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: