‘मेहता पब्लिकेशन’चे संचालक सुनील मेहता यांचे अल्पशा आजाराने निधन


हायलाइट्स:

  • प्रयोगशील प्रकाशक सुनील मेहता यांचे निधन
  • बुधवारी सायंकाळी घेतला अखेरचा श्वास
  • जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृती मराठीत उपलब्ध करण्यात मेहता यांचा वाटा

पुणे : मराठी साहित्य व्यवहार संकटात असल्याच्या सुरात सूर न मिसळता दर्जेदार, सकस आणि वैविध्यपूर्ण साहित्य उपलब्ध करून देणारे, प्रकाशनाच्या वेगळ्या वाटा चोखळणारे प्रयोगशील प्रकाशक सुनील मेहता (वय ५६) यांचं अल्पशा आजाराने बुधवारी निधन झालं आहे. मेहता पब्लिशिंग हाउसच्या (Mehta Publishing House) माध्यमातून सुनील मेहता यांनी जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृती मराठीत उपलब्ध करून वाचकांसमोर नवे विचारविश्व खुले केले.

मेहता प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्यावर किडनीच्या विकारामुळे मागील दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मेहता पब्लिशिंग हाउसच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील अनिल मेहता, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

वडील अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या मेहता पब्लिशिंग हाउस या नामांकित प्रकाशन संस्थेची जबाबदारी १९८६ मध्ये सुनील मेहता यांच्याकडे आली. मेहता यांनी अल्पावधीतच संस्थेला नावारूपास आणले. आधुनिक काळाची पावले ओळखून मेहता यांनी मराठीत सर्वप्रथम ई-बुक्सचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. मेहता पब्लिशिंग हाउसची दीड हजारांहून अधिक पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी राबवलेल्या ‘मेहता साहित्योत्सव’ याअभिनव प्रयोगाची चांगलीच चर्चा झाली.

Coronavirus Updates: दिल्लीने वाढवली देशाची चिंता!; २४ तासांत चित्र बदललं, ‘हे’ आकडे भीतीदायक

मराठी प्रकाशन विश्वात आंतरराष्ट्रीय पद्धतीने कामकाज चालवण्याची पद्धत मेहता यांनी रूढ केली. मंदीच्या चर्चेतही मराठी प्रकाशन विश्वातील धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख झाली. जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, ऍलिस्टर मॅक्लिन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी, तस्लिमा नसरिन या विख्यात लेखकांची ओळख मराठी वाचकांना मेहता यांनी करून दिली.

सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी या भारतीय लेखकांचे साहित्य मेहता यांच्यामुळे मराठीत प्रसिद्ध झाले. मराठीतील वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व. पु. काळे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर आणि विश्वास पाटील असे दिग्गज लेखकांचं लेखनही त्यांनी प्रकाशित केलं.

दरम्यान, फ्रॅंकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय बुकफेअरमध्ये तसंच २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले. मराठी प्रकाशक संघाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. पायरसीच्या विरोधात त्यांनी चळवळ सुरू केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *