हिंगोली पालिकेची गांधीगिरी, शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार


हिंगोली : शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांचा पालिकेच्या पथकाने आज सकाळी गुलाबाचे फुल देऊन सत्कार करून गांधीगिरी केली. तसेच या नागरिकांना मास्कचे वाटप करून यापुढे घराबाहेर पडतांना मास्क परिधान करण्याची विनंतीही केली. हिंगोली शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शासकिय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.

मागील ११ दिवभरात तब्बल २४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात मास्क घालूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही गर्दी करणाऱ्यांची तसेच विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, वारंवार सुचना देऊन तसेच सामाजिक अंतर पाळण्यासाठी व मास्क घालण्यासाठी दंड लावल्यानंतरही कुठलाही परिणाम होत नसल्याने पालिकेचे चक्क गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला.

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी पथके स्थापन करून तपासणी केली जात आहे. त्यासाठी पाच पथके स्थापन केली असून हि पथके शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर थांबून तपासणी करीत आहेत.

दरम्यान, पालिकेचे कर्मचारी डी.पी.शिंदे, पंडित मस्के, उत्तम जाधव, रवी दरक, पदमने, यांच्यासह पोलिसांच्या पथकाने इंदिरा गांधी चौकात थांबून वाहनांची तपासणी केली. या शिवाय रस्त्यावरून दुचाकी, ऑटोने प्रवास करणाऱ्या तसेच पायी जाणाऱ्या नागरीकांचीही चौकशी करून त्यांच्याकडे मास्क बाबत विचारणा केली. त्यानंतर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार करून गांधीगिरी करण्यात आली. या नागरिकांना यापुढे घरा बाहेर पडतांना मास्क घालूनच बाहेर पडण्याची विनंतीही पालिकेच्या पथकाने केली आहे. पालिकेच्या या गांधीगिरीमुळे विना मास्क फिरणारे नागरीक मात्र ओशाळल्याचे चित्र होते.

नागरिकांना मास्क घालूनच घराबाहेर पडावे

हिंगोली शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा गांधीगिरी करून सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. मात्र नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मास्क घालूनच घराबाहेर पडावे, असं आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *