तो नपुंसक… अत्याचार करेल कसा?; आरोपी डॉक्टरला जामीन


म. टा. प्रतिनिधी, नागपूरः बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला इरेक्टाइल डिस्फंकन (नपुंसकत्व) असल्याने तो बलात्कार कसा करेल? असा सवाल न्यायालयापुढे उपस्थित करण्यात आला. आरोपीला हा आजार असल्याचे पुरावेही न्यायालयापुढे सादर करण्यात आले. अखेर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सैयद यांनी या आरोपीचा अटकपूर्व जामीन मान्य केला. सुरेश (नाव बदलेले) असे या आरोपीचे नाव आहे.

सुरेश हा मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्यावर एका ३१ वर्षीय महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेशने त्याचे वकील जितेश दुहिलानी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सुरेश मधुमेही आहेत. त्यांच्या मधुमेहाची तीव्रता फार अधिक असून त्यांना इरेक्टाइल डिस्फंकनचा (नपुंसकत्व, लिंग ताठरतेची समस्या) त्रास आहे. त्यांना २०१९पासून हा त्रास असून त्यावर उपचारसुद्धा सुरू आहेत. त्यांच्यावर २०२१मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने अत्याचाराचा केलेला आरोप सुरेश यांना हा त्रास सुरू झाल्यानंतरचा आहे. त्यामुळे त्यांनी तिच्यावर अत्याचार करणे शक्यच नाही. तसेच या प्रकरणाशी निगडीत असलेल्या तपासाकरिता त्यांच्या अटकेची व पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. ते पोलिसांना सहकार्य करण्यासही तयार आहेत, असा युक्तिवाद बचावपक्षातर्फे करण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील अजय माहुरकर यांनी या जामिनाला विरोध केला. बचाव पक्षाने इरेक्टाइल डिस्फंकनबाबत सादर केलेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य केला.

वाचाः दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पावसामुळं असा झाला व्यवसायावर परिणाम

मोबाइल फोन जप्त करा

न्यायालयाने आरोपी सुरेशला सशर्त जामीन मान्य केला आहे. सुरेशने आपली आक्षेपार्ह छायाचित्रे त्याच्या मोबाइलमध्ये घेतली होती. त्या आधारावर तो आपल्याला धमकी देऊन आपल्यावर अत्याचार करीत होता, असा आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मान्य केला असला तरीही तपासासाठी त्याचा मोबाइल पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तक्रारदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये आणि अन्य शर्तींचे पालन करावे, असेही आदेश न्यायालयाने दिले.

वाचाः पुण्यात व्यवसाय करायचा म्हणून रचला खुनाचा कट; मुख्य सूत्रधाराला अटक

वाचाः आधी बलात्कार, नंतर गोळ्या देऊन गर्भपात; वेदना होत असतानाही डॉक्टरने केला अमानुष प्रकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *