तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहणार? आरोग्यमंत्र्यांनी अंदाजपंचे सांगितलं!


जालना : तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव नक्की कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. आज राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असं सांगितलं.

राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. ‘जान है तो जहान है’ असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं आहे, असं टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तरं देताना म्हटलं.

आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती, सद्य स्थितीत उपलब्ध असलेली साधनसामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली. आता निधी खर्च करण्याला वेग येईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले. बूस्टर डोस, लहान मुलांच्या लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्याचं टोपे म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *