नियम मोडला की कारवाई अटळ, ५०% पेक्षा जास्त गर्दी, औरंगाबादच्या प्रसिद्ध हॉटेलला टाळं, त्यामुळे….


औरंगाबाद : कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील प्रसिद्ध हॉटेलवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. तर पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश संबंधित हॉटेल चालकाला देण्यात आले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना हॉटेलमध्ये प्रवेश देता येणार नाही, असा आदेश असतानाही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २५ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा आधिक ग्राहकांना परवानगी देता येणार नसल्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र असे असताना शहरातील अनेक हॉटेलमध्ये या नियमांचे उल्लंघन होत असल्याने, अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत मेसर्स सात्विक फुड, शाही भोज थाली रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग पाहणीसाठी गेले असता, या रेस्टॉरंटमध्ये अनेक कार्यक्रम सुरु होते. तसेच लोकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ५०% ग्राहकांना परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ग्राहक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते. तर अनेक कर्मचाऱ्यांनी मास्क देखील लावलेले नव्हते. त्यामुळे कोरोना नियम मोडणारं हॉटेल बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर पुढील आदेशापर्यंत हे हॉटेल उघडता येणार नाही, असेही आदेश प्रशासनाने काढले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *