चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; छगन भुजबळांनी केला पलटवार!


हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  • छगन भुजबळांनी केला पलटवार
  • महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा पुन्हा राजकीय कलगीतुरा

नाशिक :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि भाजपला विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारावी लागली. ही राजकीय समीकरणे बदलल्यापासून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून पुन्हा हा राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. (Chhagan Bhujbal Latest News)

‘बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मेहनतीमुळे उद्धव ठाकरे यांना आयतं ताट मिळालं,’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. पाटील यांच्या या टीकेला आता महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘बरं झालं, रश्मीताईंना ‘फडणवीसांच्या पत्नीची’ उपमा दिली नाही, नाहीतर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती’

‘बाळासाहेब ठाकरे यांच्या आधी प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रात सामाजिक काम केलं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनीही काम केलं आणि त्याचंच बाळकडू उद्धव ठाकरे यांना मिळालं. तेही मागील २०-२५ वर्षांपासून या राज्याच्या राजकारणात आहेत. त्यांनी स्वत:च्या जीवावर आमच्या महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकून आणल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात येऊन निवडणूक जिंकले,’ असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबतच्या कथित चुकीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांबाबतही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही चूक होता कामा नये. मात्र कालच्या घटनेबाबत दुसरीही बाजू समोर येत आहे. पंतप्रधानांच्या सभेला केवळ ७०० लोक आल्यानेच ही सभा रद्द करण्यात आली, असं बोललं जात आहे, त्यामुळे नेमकं काय झालं हे बघावं लागेल,’ असं ते म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *