तर राज्यावर आरोग्याचे संकट कोसळेल, नागपूर खंडपीठाची सरकारवर नाराजी


म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शहरातील करोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडते आहे. शहर तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) औषधे आणि सर्जिकल साहित्याचा साठा अपुरा आहे. संसर्ग वाढताना आणि या नव्या लाटेला तोंड देताना डॉक्टरांकडील आवश्यक ती साधन सामुग्री अपुरी असल्यास संपूर्ण राज्यावर आरोग्याचे संकट कोसळेल, अशी चिंता व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारने तातडीने वैद्यकीय साहित्याचा साठा पुरवठा करावा असे आदेश दिलेत.

मेडिकलमधील वैद्यकीय सुविधांसंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सरकारी रुग्णालयांना साहित्य पुरविण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्युटकडे आहे. मेडिकलने त्यासाठी निधीही अदा केला आहे. मात्र, अद्याप मेडिकलला हे साहित्य प्राप्त झालेले नाही. यात औषधी, सर्वसामान्य सर्जिकल साहित्य, आयव्ही, आणि ग्लोव्ह यांचा समावेश आहे, अशी माहिती न्यायालयमित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी न्यायालयाला दिली.

यावर न्यायालयानेसुद्धा नाराजी व्यक्त केली. या माहितीवरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात राज्याची प्रशासकीय उतरंड कुठेतरी अपयशी ठरतेय. यामुळे तिसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या समाजाचे आणि वैद्यकीय क्षेत्राचे प्रयत्न व्यर्थ ठरू शकतात. आज शहरात ३५० तर राज्यात १९ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.

‘एकीकडे बाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्राकडे पुरेशी साधन सामुग्री नसल्यास राज्यावर आरोग्याचे संकट कोसळू शकते आणि ते टाळायला हवे. त्यामुळे राज्य सरकारने यावर तातडीने कारवाई करीत आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *