‘महिलांनो पोथ्या-पुराण सोडा, ग्रामगीतेचं पालन करा, येणारा काळ तुमचाच’


अकोला : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उध्दारी असे म्हटले जाते, मात्र आता महिलांनी रुढी परंपरा यांना झुगारून ग्रामगीता आचरणात आणली पाहिजे, कारण राष्ट्र बालशाली बनविण्यासाठी महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि राष्ट्रसंतांच्या साहित्य महिलामध्ये रुजविणे काळाची गरज आहे, असा सूर रविवारी महिला परिसवांदतून रविवारी उमटला.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे वतीने आयोजित आठवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन अकोल्यात पार पडत आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘वर्तमान परिस्थितीत महिलांमध्ये विचार रुजविणे काळाची गरज’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, डॉ. ममताताई इंगोले, जया मांजरे आदी विचारपीठावर उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ गुरुदेव प्रचारक सुधाताई जावंजाळ उपस्थित होत्या.

या परिसंवादात सर्वप्रथम जया मांजरे यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून मांडलेली महिलोन्नतीचा आशय देत महिलांना संघटित होऊन सामाजिक क्रांतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत आपली भूमिका विषद केली. त्यानंतर वक्त्या डॉ ममताताई इंगोले यांनी आपल्या भाषणातून महिलांनी रोज साहित्य वाचलं पाहिजे, आणि तेही राष्ट्रसंतांचे साहित्य आवर्जून वाचले पाहिजे, महिला जर संस्कारित झाल्या तरच पिढी सुसंस्कारीत घडेल यासाठी ग्रामगीतेचा जागर झाला पाहिजे, असं सांगत त्यांनी माय या कवितेतून महिलांच्या संवेदना व्यक्त केल्या.

तर प्रमुख वक्ते गुंजन गोळे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा मागोवा घेत आपल्याला ही काम करण्याची ऊर्जा राष्ट्रसंतांच्या साहित्यातून मिळत असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रसंतांनी सांगितल्यानुसार मानवधर्म जोपासला पाहिजे हा मर्म घेऊन कामाची वाटचाल सुरु केली आणि शेकडो मुलांना जीवनदान देण्याचे पुण्य मिळाले ही ताकद राष्ट्रसंतांच्या साहित्यातून मिळत असते. देव देवळात नाही तर प्रत्येक माणसात शोधता आला पाहिजे त्यासाठी दृष्टी लागते आणि ही दृष्टी ग्रामगीतेतून मिळते, त्यासाठी प्रत्येक महिलांनी ग्रामगीता वाचून आत्मसात केली पाहिजे, असं गुंजन गोळे म्हणाल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *