‘पंकजाताई दुसऱ्यांदा कोरोना झालाय, काळजी घे गं’; भाऊ धनंजय मुंडेंकडून तब्येतीची विचारपूस


बीड : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचंच….! काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. आज लगोलग धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मेसेज करुन तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘पंकजाताई दुसऱ्यांदा कोरोना झालाय, काळजी घे’, असा सल्ला त्यांनी मेसेजद्वारे दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडेंच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली तसंच प्रकृती सांभाळण्याचा सल्ला दिला. धनंजय मुंडे आज बीडमध्ये होते. यावेळी पत्रकारांनी, ‘पंकजा मुंडे यांना कोरोना झालाय, तुम्ही त्यांना फोन केलात का? त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली का?’ असे प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना धनंजय मुंडे यांनी, ‘फोन केला नाही, परंतु मेसेजवर ताईच्या तब्येतीची विचारपूस करत प्रकृती सांभाळण्याचा सल्ला’ दिल्याचं सांगितलं.

धनंजय मुंडे म्हणाले “मी पंकजाताईला फोन तर करु शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितलं की तुला दुसऱ्यांदा कोरोना झालाय. कोरोना काळात काळजी घेणं फार महत्वाचं असतं. त्यामुळं सध्या विशेष काळजी घेण्याची गरज आहे, तू व्यवस्थित काळजी घे”

राजकारणाच्या आखाड्याबाहेरचं मुंडे भावा बहिणीचं प्रेम!

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही भावंडं असली तरी त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्याची एकही संधी दोघेही भाऊ बहीण सोडत नाहीत. पण कौटुंबिक सलोखा मात्र कायम जपतात. याची प्रचिती कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानही महाराष्ट्राला बघायला मिळाली. पंकजा- धनंजय दोघांनाही कोरोना झालेला असताना दोघांनीही एकमेकांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, अद्याप कोरोना संपलेला नसून नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं, अन्यथा घरातच राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, शासनाने घालून दिलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळावेत, असं आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *