Coronavirus In Delhi: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत करोनाचा स्फोट; २४ तासांत तब्बल…


हायलाइट्स:

  • नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत करोनाचा स्फोट.
  • गेल्या २४ तासांत २ हजार ७१६ नवीन करोना बाधितांची भर.
  • मे महिन्यानंतरची सर्वोच्च रुग्णसंख्या, १२ दिवसांत चित्र बदलले.

नवी दिल्ली: देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून राजधानी दिल्लीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. दिल्लीत रुग्णसंख्येत थेट ५० टक्के वाढ झाली असून गेल्या २४ तासांत २ हजार ७१६ नवीन करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. २१ मे २०२१ नंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. २१ मे रोजी ३००९ नवे रुग्ण आढळले होते. ( Coronavirus In Delhi Latest Breaking News )

वाचा:ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी; केंद्राने राज्यांना दिले अत्यंत महत्त्वाचे निर्देश

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा प्रमुख शहरांत अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. दिल्लीतील करोनाची आजची आकडेवारी आरोग्य यंत्रणेला हादरवणारी ठरली आहे. दिल्लीत दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजाराच्या जवळ पोहचली आहे. आज एकाच दिवशी दिल्लीत करोनाचे २ हजार ७१६ नवे रुग्ण आढळले. ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दिल्लीत शुक्रवारी करोनाचे १ हजार ७९६ नवे रुग्ण आढळले होते आणि पॉझिटिव्हिटी रेट २.४४ इतका होता. त्यात आज मोठी वाढ झाली. आज पॉझिटिव्हिटी रेट थेट ३.६४ वर पोहचला आहे. मुख्य म्हणजे २० डिसेंबर रोजी दिल्लीत करोनाचे केवळ ९१ नवे रुग्ण आढळले होते व कोविड पॉझिटिव्हिटी रेट ०.२० इतका होता. त्यानंतर अवघ्या १२ दिवसांत चित्र पूर्णपणे बदलले असून ७ महिन्यांपूर्वीची स्थिती परत निर्माण झाली आहे.

वाचा: ओमिक्रॉनने चिंता वाढवली… रुग्णसंख्या हजारावर

दरम्यान, करोनाचा वाढता धोका लक्षात घेत दिल्ली सरकार सतर्क झालं आहे. एकीकडे नव्याने काही निर्बंध लावतानाच आरोग्य व्यवस्थेवरही लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत माहिती दिली. दिल्लीतील सद्यस्थिती लक्षात घेता लहान मुलांसाठी ३ हजारपेक्षा जास्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास करोनावर नियंत्रण मिळवणं अधिक सोपं जाईल. त्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर सक्तीने केला गेला पाहिजे. त्याशिवाय इतर दिशानिर्देशही पाळले गेले पाहिजेत, असे जैन यांनी सांगितले. ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत आहे. त्यासाठीची तयारी आम्ही पूर्ण केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. ओमिक्रॉनबाबत बोलताना, दिल्लीत ओमिक्रॉन बाधित एकाही रुग्णाला अद्याप ऑक्सीजनची गरज भासलेली नाही, असे जैन म्हणाले.

वाचा:पुलवामाचा हिशेब चुकता; हल्ल्यातील शेवटच्या दहशतवाद्यालाही टिपलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *