नगर जिल्हा रुग्णालय आग: महिना उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात


अहमदनगर: नगरच्या जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीचा चौकशी अहवाल सरकारला वेळेत सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर सरकारकडून त्यावर काहीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. एवढेच नव्हे तर तो जाहीरही करण्यात आला नाही. नगरचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्रीही या अहवालासंबंधी माहिती नसल्याचे सांगत आहेत. १४ जणांचा बळी घेणाऱ्या आगीला जबाबदार कोण? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. नवीन वर्षात तरी याची उकल होऊन कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सहा नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयातील या कक्षाला आग लागली होती. प्रथमदर्शनी ती शॉर्टसर्किट होऊन लागल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सहा जणांना निलंबित करण्यात आले. पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळाला. दुर्घटना घडल्यानंतर भेट दिलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौकशीची घोषणा केली. त्यानुसार नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. समितीने चौकशी करून नोव्हेंबर महिन्यातच आपला अहवाल सादर केला आहे.

वाचा: ठाकरे सरकारचे टेन्शन वाढले! राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना करोना

सरकारला अहवाल सादर करून आता महिना उलटून गेला. मात्र, या अहवालात काय म्हटले आहे? आणि सरकारने त्यावर काय कारवाई केली? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटना घडली तेव्हा रान पेटविलेल्या विरोधी पक्षानेही अधिवेशनात आणि त्यापूर्वीही यासंबंधी सरकारला जाब विचारला नाही.

समितीचे अध्यक्ष गमे नुकतेच नगरला आले होते. त्यांनी आपल्या समितीने वेळेत अहवाल सादर केला असून कोणालाही पाठीशी घालण्यात आले नाही, असे सांगितले. मात्र, अहवालात नेमके काय आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तो सरकारचा अधिकार असल्याचे ते म्हणाले. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या अहवालासंबंधी आपल्याकडे माहिती नसल्याचे सांगून सरकारकडूनच यावर घोषणा होईल, असे सांगितले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले आहे. घटना घडली तेव्हा सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. यातून सरकारची तत्परता दाखवून देण्याचा मंत्र्यांचा उद्देश होता. आता अहवाल सादर होऊन एक महिना झाला तरीही त्यावर कार्यवाही होत नसल्याने सरकारने खरेच हे प्रकरण गांभीर्याने घेतले का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. भंडारा येथील रुग्णालयातील आगप्रकरणीही अशीच दिरंगाई पाहायला मिळाली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्लीन चीट?

या आग प्रकरणी ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवालात क्लीन चीट मिळाली असून ते पुन्हा कामावर येणार असल्याची रुग्णालय वर्तुळात चर्चा आहे, मात्र याला दुजोरा मिळाला नाही. दुसरीकडे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपासही थांबला आहे. त्यांनाही अधिक तपासासाठी अहवाल आणि काही कागदपत्रांची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात येते. एकूणच गेल्या महिन्यात काही काळ तापलेले हे प्रकरण आता थंड्या बस्त्यात गेले आहे.

वाचा: वैष्णोदेवी मंदिरात नेमकं काय घडलं? का झाली चेंगराचेंगरी? प्रत्यक्षदर्शी म्हणतात…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *