शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरुच, एकनाथ शिंदे यांच्याकडून रुईकर कुटुंबियांना ५ लाखांची मदत


बीड : मुख्यमंत्र्यांसाठी प्राणाची आहुती दिलेल्या दिवंगत शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी दुसऱ्या दिवशीही शिवसेनेच्या वतीने मदतीचा ओघ सुरुच राहिला. काल शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ५ लाख रुपयांची रोख मदत केल्यानंतर आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाला 5 लाख रुपयांची तात्पुरती मदत पोहोचवली. एकनाथ शिंदे साहेब यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी रुईकर कुटुंबाकडे मदत सुपूर्द केली.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, त्यांना दिर्घायुष्य लाभावं यासाठी बीड ते तिरुपती पायी वारी करताना रस्त्यातच सुमंत रुईकर यांच्यावर काळाने घाला घातला. मृत्यूमुखी पडलेल्या सुमंत रुईकर यांच्या उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना शिवसेनेने मोठा आधार दिला. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरु आहे.

मंत्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी आज मंगळवारी सकाळी रुईकर कुटुंबियाची भेट घेतली. पाच लाख रुपयांची रोख मदत त्यांनी रुईकर कुटुंबियांकडे सुपुर्द केली. तत्पूर्वी शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलवरून रुईकर कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांचे सांत्वन केले. या संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व आपण स्विकारत आहोत. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष भेटीला येऊ, त्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम करून देऊ असा शब्द त्यांनी दिला.

यावेळी, ‘साहेब आम्हाला तुमच्याशिवाय कुणी नाही. आमच्या घरातील कर्ताधर्ता माणूस देवाघरी गेलाय. आमच्या कुटुंबावर लक्ष ठेवा. आम्हाला मदत करा. माझ्या नोकरीचंही बघा’, अशी विनवणी सुमंत रुईकर यांच्या पत्नीने एकनाथ शिंदे यांना व्हिडीओ कॉलद्वारे केली. त्यावर तुम्ही कसलीही काळजी करु नका. शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांना धीर दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *