पोलीस-आरोपींमध्ये सिनेस्टाइल चकमक! पोलीस आयुक्तांनी झाड उचलून आरोपींवर फेकले?


राजा गायकवाड । पिंपरी

पिंपरी चिंचवड पोलिस आणि खुनातील तीन आरोपींमध्ये रविवारी रात्री सिनेस्टाइल चकमक उडाली. पोलिसांना पाहताच आरोपींनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, तर पोलिसांनीही आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. हे प्रकरण एवढ्याच थांबले नाही तर, पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर खुद्द पोलिस आयुक्तांनी बाहुबली स्टाइलने झाड फेकल्याने तिन्ही आरोपी खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी झडप घालून आरोपींना जेरबंद केले.

गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २२, सर्व रा. सांगावी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास योगेश जगताप याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपीस सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडूनही दोन पिस्तूल जप्त करण्यात आली होती.

वाचा: राज्यात इन्कम टॅक्सच्या धाडी; एकाच वेळी पोहोचले १७५ अधिकारी, पैसे मोजण्यासाठी लागले १२ तास

जगताप खून प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असली तरी मुख्य तीन आरोपी फरार होते. वारंवार आपला ठावठिकाणा बदलत तसेच संवादासाठी इन्स्टाग्रामचा वापर करत हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. हे तिन्ही आरोपी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोये, कुरकंडी गावात फिरत असल्याची माहिती सांगावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार चार टीम करून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. स्वतः पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कोये येथे शेताच्या कडेला एका घराशेजारील झाडीत दुचाकी दिसून आली. त्यानंतर त्या घराची रेकी केली असता घरात तीन लोक असल्याचे निश्चित झाले. मात्र, तेवढ्यातच आरोपींना पोलिसांची चाहूल लागली आणि आरोपींनी पळून जाण्यास सुरुवात केली. पोलिस आरोपींचा पाठलाग करू लागले असता दोन आरोपींनी पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनीही आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, आरोपी हाती लागले नाही. या नंतर मात्र, खुद्द पोलिस आयुक्तांनी जंगलात पडलेले एक झाड उचलून ते पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर फेकले. हा प्रहार एवढा जोरात होता की तिन्ही आरोपी जागीच खाली पडले. त्यांनतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

आयुक्तांच्या पराक्रमाबाबत दावे, प्रतिदावे…

आरोपींना पकडण्यासाठी आयुक्तांनी बाहुबली बनत झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकल्याचा दावा केला जात आहे. आयुक्तांचा हा कारनामा कौतुकाबरोबर चर्चेचा विषय ठरला आहे. झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकने हे खूपच सिनेस्टाईल वाटत असून, नक्की असे घडले का, अशी प्रतिक्रियाही विविध स्तरांतून उमटत आहे. आयुक्तांवर कोणताही गोळीबार झाला नाही. आरोपींना पकडताना तसेच झाड उचलताना त्यांना थोडेसे खरचटले आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयुक्तांनी उचललेले झाड चाकण पोलीस ठाण्यात…

पोलिस आयुक्तांनी उचललेले झाड चाकण पोलिस ठाण्यात आणून ठेवण्यात आले आहे. चकमकीत तसेच आरोपींना पकडण्यासाठी वापरण्यात आल्याने हे झाड पोलिस ठाण्यात आणले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पिंपळे गुरव येथील खून प्रकरणी सात अटकेत

पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास योगेश जगताप याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपीस सात आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडूनही दोन पिस्तूल जप्त करण्यात आली होती.

वाचा: राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; शरद पवार म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *