वडिलांनी प्रेमानं आणलेला खाऊ खाल्ल्यानंतर सुरू झाला त्रास; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?


हायलाइट्स:

  • सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात हादरवून टाकणारी घटना
  • वडिलांनी आणलेला खाऊ खाल्ल्यानंतर चिमुकल्यांचा मृत्यू
  • अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

सुनील दिवाण । पंढरपूर

मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातील मरवडे येथे दोन चिमुरड्या बहिणींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून यात विषबाधेचा संशय व्यक्त होत आहे. चिमुकल्या बाळाने पप्पांना खाऊ मागितला आणि वडिलांनी गावातील दुकानातून श्रीखंड, बासुंदी, पनीर, रबडी असे पदार्थ आणले. मात्र हा खाऊ खाल्यानंतर या मुलींना त्रास सुरू झाला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बुधवार, २२ डिसेंबर रोजी आबासो चव्हाण यांनी चिमुकलीच्या मागणीवरून मंगळवेढा येथून श्रीखंड आणला होता. श्रीखंड खाल्ल्यानंतर दोन्ही मुलींना त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल केले असता मोठी मुलगी स्वरा आबासो चव्हाण (वय वर्षे ६) हिचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर छोटी मुलगी नम्रता आबासो चव्हाण (वय वर्षे ४) हिलाही त्रास होऊ लागला. उपचार सुरू असतानाच तिचाही गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या दोन सख्ख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्युमुळे मरवडे परिसर व मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा: ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

आबासो चव्हाण हे स्कूल बस चालक आहेत. मागील १५ वर्षांपासून ते स्कूल बस चालवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत आहेत. हुलजंती, मरवडे आदी भागातील शेकडो लहान मुलांना ते मंगळवेढा येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नेण्या-आणण्याचे काम करतात. त्यांच्यामुळे शाळकरी मुलांच्या प्रवासाची चिंता मिटली आहे. लहान मुलांचे लाडके चालक म्हणून ते ओळखले जातात. मात्र, त्यांच्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चव्हाण यांच्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या अकस्मात मृत्यू अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मुलींच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील गूढ उलघडू शकणार आहे.

वाचा: सांगलीत भयंकर अपघात; एफडीएच्या अधिकाऱ्यासह तिघे ठार, एक जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *