प्राणवायू गळती थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना Measures to stop oxygen leakage
प्रत्येक कोविड रुग्णालयात नोडल अधिकारी नियुक्त
वर्धा, (जिमाका)- इतर जिल्ह्यात प्राणवायू गळतीच्या आणि आगीच्या दुर्घटना बघता भविष्यात आपल्या जिल्ह्यात अशा घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी खबरदारीच्या उपयोजना सुरू केल्या आहेत. त्याचा महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णालये आणि जिल्हा कोविड आरोग्य केंद्र येथील ऑक्सीजन टॅंक आणि प्राणवायू पुरवठा करणारी वाहीनी सुस्थितीत राहण्यासाठी तसेच सर्व रुग्णालयाचे आग प्रतिबंधात्मक उपाय योजनांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक रुग्णालयासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढ लक्षात घेता त्यांचे उपचाराकरीता मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णालये आणि जिल्हा कोविड आरोग्य केंद्र या रुग्णालयातील ऑक्सीजन पुरवठा करणारी वाहिनी सुस्थितीत राहण्यासाठी त्याची दैनंदिन तपासणी करणे आवश्यक ठरते. तसेच आग प्रतिबंधात्मक आणि बचाव आराखड्याबाबत सुद्धा तपासणी करणे आवश्यक आहे.
म्हणूनच रुग्णालयातील ऑक्सीजन साठा टाकीपासून पासून ऑक्सीजन पुरवठा करणारे गॅस वाहिनी सुस्थितीत असल्याची व ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होत असल्याबाबत दैनंदिन तपासणी करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात जिल्ह्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
1 जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी – आचार्य श्रीमन्न नारायण तंत्रनिकेतन, पिपरी (मेघे) तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी वर्धा येथील तज्ञ, 2 .आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालया साठी अग्नीहोत्री कॉलेज ऑफ इंजिनियरिंग तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा, 3.कस्तुरबा गांधी रुग्णालय, सेवाग्रामसाठी बापूराव देशमुख इंजि. कॉलेज, सेवाग्राम, 4. उप जिल्हा रुग्णालय, हिंगणघाटसाठी औद्योगीक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट येथील तर 5. उपजिल्हा रुग्णालय, आर्वीसाठी शासकिय तंत्र निकेतन आर्वी येथील तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
भविष्यातील घटना टाळण्यासाठी नियुक्त केल्या
तज्ञ व्यक्ती संबंधित रुग्णालयातील प्राणवायु पुरवठ्या संबंधित सर्व बाबींची काटेकोर तपासणी करून अहवाल सादर करणार आहेत.