लसीकरण हे संक्रमण थोपवण्याचे अस्त्र आहे, निश्चित कालमर्यादेत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची आवश्यकता-डॉ साळकर

लसीकरण हे संक्रमण थोपवण्याचे अस्त्र आहे, निश्चित कालमर्यादेत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची आवश्यकता-डॉ साळकर Vaccination is a weapon to prevent infection, large-scale vaccination is required within a certain period of time – Dr.Salkar
 पणजी, 26 एप्रिल 2021 - सध्याच्या कोरोना महामारीचे संकट थोपवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी अस्त्र असल्याचे डॉ शेखर साळकर म्हणाले.गोव्यातील मणिपाल रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ शेखर साळकर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाने धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “लसीकरणाची आवश्यकता का?” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. 

  सध्या आपल्याकडे उपलब्ध माहितीनुसार, लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असून, त्याचे दुष्परिणाम अगदी नगण्य आहेत. तसेच लसीकरणानंतरही कोविडचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे कमी कालावधीत किमान 70% लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे डॉ साळकर म्हणाले. 

लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. ‘टीका उत्सवा’नंतर लसीकरण मोहिमेला गती आल्याचे डॉ शेखर साळकर म्हणाले. 

   लस सर्वांसाठी सुरक्षित आहे.मात्र गर्भवती, स्तनदा महिला आणि अ‍ॅलर्जिक व्यक्तींनी लस घेऊ नये, असे शासकीय नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणानंतर सौम्य लक्षणं दिसून येणे ही नियमित बाब आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही असे त्यांनी सांगितले.  

     युवा वर्गाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. त्यामुळे युवावर्गाने 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आवर्जुन सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ साळकर यांनी केले. 

  लसीकरणानंतरही कोविड अनुरुप योग्य वर्तन म्हणजे मास्कचा नियमित वापर,हातांची स्वच्छता आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर या बाबींचे पालन करणे महत्त्वाचे आहे.मास्क वापरल्यामुळे संसर्गाचे प्रमाण होण्याची शक्यता 95% नी कमी होते, अशी माहिती त्यांनी दिली.  

एका प्रश्नावर उत्तर देताना डॉ साळकर म्हणाले की, लसीची पहिला मात्रा घेतल्यानंतर जर कोविड संसर्गाची लागण झाली तर, 6 आठवड्यानंतर दुसरी मात्रा घ्यावी. तसेच, रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर सहा आठवड्यांनी लस घ्यावी. लस घेण्यापूर्वी जर काही लक्षणे असतील तर अगोदर चाचणी करुन घ्यावी.   
मासिक पाळीविषयीच्या अपप्रचाराला बळी पडू नका, महिलांसाठी लसीकरण सुरक्षित
 कोविड लसीकरणाविषयक कोणत्याही अप प्रचाराला बळी पडू नका.महिलांनी मासिक पाळीच्या काळात लसीकरण करुण घेणे अगदी सुरक्षित आहे,असे डॉ साळकर यांनी सांगितले.  

 वेबिनारमध्ये धेंपे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती गौरी तांबा याही सहभागी झाल्या होत्या. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: