उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित महिलेची प्रसुती , बाळ अन् माता दोघेही सुखरुप

उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित महिलेची प्रसुती , बाळ अन् माता दोघेही सुखरुप Corona-infected woman gives birth at sub-district hospital

पंढरपूर, दि.24 – उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे कोरोना बाधित महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली. सदर महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तीने एका नवजात बालकाला जन्म दिला. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली.

भाळवणी ता.पंढरपूर येथील 21 वर्षीय महिलेस उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सदर महिलेजवळ सोनोग्राफी अथवा इतर तपासणीचे कोणतेही रिपोर्ट नसल्याने तीची कोरोना चाचणी व इतर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सदर महिला कोरोना बाधित आढळून आल्याने या महिलेस सिव्हील रुग्णालय,सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविणे आवश्यक होते.परंतु महिलेची तपासणी केली असता माता व बालकास धोका होण्याची शक्यता असल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम यांनी घेतला. आज शनिवारी सकाळी 6.30 वाजता महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली.या महिलेने बालकास जन्म दिला असून, जन्माच्यावेळी त्याचे वजन 2 किलो 400 ग्रॅम भरले आहे. पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर महिलेची प्रसुती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी गजानन गुरव व उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी  दिली.

ही प्रसुती यश्वस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉ.प्रदिप केचे, बालरोग तज्ञ डॉ.किरण मासाळ,स्त्री रोग तज्ञ डॉ.भिंगे, कक्षसेविका रेश्मा रंदवे, परिचारिका चंदा मिसाळ,अनुजा सरवदे, लॅब तंत्रज्ञ श्री.देवकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: