रायगडमधील 11 उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य रिक्त पदे भरुन कोरोनाच्या काळात होणारी रुग्णांची हेळसांड थांबवावी – आरोग्य साहाय्य समितीची रायगड जिल्हाधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे मागणी Filling vacancies in hospitals should stop care of patients during Corona period – arogya seva samiti
पनवेल,दिनांक 23/04/2021- सध्या कोरोना महामारीच्या भयंकर स्वरूप धारण केले असून सर्वत्र रुग्णांची परवड होत असल्याचे भीषण चित्र आहे.त्यात ऑक्सिजन , इंजेक्शन आणि खाटांची पुरेशी अन् वेळेवर उपलब्धता नसल्याने रूग्णांचा जीव गमवावा लागत आहे.अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील 5 उपजिल्हा आणि 9 ग्रामीण अशा एकूण 14 रुग्णालयांपैकी केवळ महाड आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालय अन् श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथेच वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. तर उर्वरित 11 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षक हे पद मागील काही वर्षांपासून अजूनही रिक्त आहे. त्याचबरोबर भूलतज्ञ, अस्थितज्ञ, शल्य चिकित्सक आदी महत्त्वाची पदेही रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून उपचारासाठी येणार्या रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच रुग्णांना आर्थिक हानी सोसून अन्यत्र उपचार घेण्याची वेळ येत आहे. अशा वेळी तरी नागरिकांना सर्व सुविधांसह उपचार मिळण्या साठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीचे समन्वयक डॉ.उदय धुरी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात असलेल्या नागरिकांना योग्य वेळेत योग्य तज्ञांकडून उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असणे, तसेच आपत्कालीन स्थितीत जनतेला आरोग्य सेवेचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी मागणीही आरोग्य साहाय्य समितीने केली आहे.