पोटनिवडणुकीनंतर उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकास जबाबदार कोण ? – गणेश अंकुशराव

पोटनिवडणुकीनंतर उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकास जबाबदार कोण ? – गणेश अंकुशराव Who is responsible for the post-by-election corona outbreak ? – Ganesh Ankushrao

पंढरपूर,(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळातही पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी सह भाजपाचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी पंढरपूरमध्ये तळ ठोकला, मोठमोठ्या प्रचारसभा पार पडल्या या सभांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्स न पाळता हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले. त्यामुळे निवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल विचारत दोन्ही तालुक्यातील जनतेला कोरोनाच्या महाभयानक विळख्यात लोटणार्‍या सर्वच राजकारण्यांचा निषेध व्यक्त करतो,असे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे मत व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या सावटाखाली संपुर्ण देश असताना आणि महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली असतानाच कोरोना प्रतिबंधासाठीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठमोठ्या प्रचारसभा झाल्या. याला राजकीय नेत्यांचा अक्षम्य बेजबाबदारपणाच म्हणावे लागेल.निवडणुकीनंतर कोरोना रोखण्या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करणे हा फार्स आत्ता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर कशासाठी ?

  राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या पोट निवडणुकीत नियमबाह्य सभा घेतल्या, कोरोना रोखण्यासाठीचे सर्व नियम पायदळी तुडवले, हे सर्व करताना तुम्हाला तुमच्या जबाबदारीचे भान नव्हते का ? असा सवाल करत गणेश अंकुशराव यांनी पंढरपूर पोटनिवडणुक काळात नियम मोडणार्‍या सर्वच राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: