जितेंद्र आव्हाडांनी उल्हासनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे आदेश दिले खरे, पण…


म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची आघाडी करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले असले तरी निवडणुकीनंतर महापौरपदावर पहिला दावा कोणाचा, याबाबत दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही पक्ष सध्याच्या घडीला शहरातील राजकारणात स्वत:ला मोठा भाऊ म्हणवून घेत आहेत. यावरून आतापासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये महापौरपदावरून जुंपली आहे. त्यामुळे या आघाडीचे भवितव्य निवडणुकीनंतर काय वळण घेते, याबाबत आत्तापासूनच शहरात चर्चांना उधाण आले आहे.

उल्हासनगर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतीच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आघाडीची अधिकृत घोषणा केली असली तरी गेल्या दोन वर्षांपासूनच राष्ट्रवादीचा शिवसेनेला महापालिकेत पाठिंबा असल्याने महापालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत कलानी गटाऐवजी राष्ट्रवादीचे अस्तित्व दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा पातळीवरील नेते प्रयत्नशील आहेत. तर, आगामी काळात कलानी कुटुंबाकडून तडजोडीच्या राजकारणाऐवजी पदांवरील दाव्याचे राजकारण केले जाणार आहे. त्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पप्पू कलानीचा करिष्मा मतदारांना आकर्षित करण्यास महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

वाचा: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराची माहिती अधिकाऱ्यांनी लपवली; ठाण्याचे महापौर भडकले!

उल्हासनगर महापालिका हद्दीत सिंधी मतांचे वेगळे महत्त्व असून महापालिकेतील सत्तेच्या चाव्या निवडणुकीनंतर सिंधी समुदायाचा पाठिंबा असलेल्या साई, कलानी गटांसारख्या पक्षांकडे राहिल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येच्या बळावर भाजपला नमवणाऱ्या आणि यंदाच्या निवडणुकीत पप्पू कलानीच्या नावावर अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या टर्ममध्ये महापौरपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आघाडीच्या माध्यमातून सत्तेपर्यंत जाणाऱ्या मार्गात महापौरपदावरून निवडणुकीनंतर फाटाफूट झाल्यास महापालिकेत भविष्यात नवीनच आघाडी अथवा युती पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाचा: आदिवासींच्या पाण्यावर येऊरमधील धनदांडग्यांचा डल्लाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: