IND v NZ : शुभमन गिल आता तरी सुधार; नाही तर तुझापण पृथ्वी शॉ होईल…


INDvsNZ : कानपूर : दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतलेला शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला रंगात असल्याचे दिसून आले. सावध सुरवात केल्यानंतर त्याने आपला नैसर्गिक खेळ करण्यास सुरवात केली आणि कारकिर्दीतील चौथे अर्धशतकही झळकावले. शुभमन आता मोठी धावसंख्या उभारतो की काय असे वाटत असताना जेमिसनच्या एका सुंदर चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांच्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. गिल जर असाच खेळत राहीला तर त्याचे पण पृथ्वी शॉसारखे होईल आणि तो संघाबाहेरच राहील, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.जगजाहीर झाली शुभमनची कमजोरी
दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध खेळू न शकलेल्या गिलने ५२ धावा फटकावल्या. बाद होण्यापूर्वी त्याने चारही दिशांना आकर्षक फटकेबाजी केली. फिरकीपटूंना साथ देईल असे वाटणाऱ्या ग्रीन पार्कच्या खेळपट्टीने फिरकीपटूंना बॅकफूटवर टाकले. आपल्या अर्धशतकी खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावल्यानंतर शुभमनची जुनी कमजोरी पुन्हा एकदा समोर आली. जी आता जगजाहीर झाली आहे. कसोटी कारकीर्दीत १४ वेळा बाद झालेला शुभमन सहा वेळा एलबीडब्ल्यू किंवा त्रिफळाचित झाला आहे. सलामीवीर खेळाडूसाठी आवश्यक असलेला डिफेन्स त्याच्याकडे नाही.
गिलच्या तंत्राची अडचण
उपाहारानंतर पहिल्याच षटकात जेमिसनचे चेंडू स्विंग होऊ लागले. गिलला पहिल्या पाच चेंडूवर त्रास दिल्यानंतर अखेरच्या सहाव्या चेंडूवर जेमिसनने गिलचा त्रिफळा उडवला. ६ फूट ८ इंच उंच असलेल्या जेमिसनने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक सुरेख चेंडू टाकला, ज्याचा बचाव गिल करू शकला नाही. चेंडू खेळताना त्याच्या पॅड आणि बॅटमध्ये खूप अंतर राहिले होते. त्यामुळे बॅटची किनार घेऊन चेंडू थेट यष्टीवर आदळला.

जेमिसन टीम इंडियासाठी ठरला घातक
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जर कोणत्या किवी गोलंदाजाने छाप पाडली असेल, तर तो काईल जेमिसन. त्याने भारताच्या वरच्या फळीला तंबूचा रस्ता दाखवला. मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे हे तिन्ही खेळाडू त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. तीनपैकी दोघे त्रिफळाचित झाले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर काइल जेमिसन भारतासाठी मोठा धोका बनला आहे. जूनमध्ये झालेल्या विजेतेपदाच्या कसोटी सामन्यात जेमिसनने पाच विकेट घेत भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त केली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: