टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार बनला ‘बापमाणूस’; फोनवरून मिळाली गुड न्यूज


नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिल्यांदाच ‘बाप’ बनला आहे. त्याची पत्नी नुपूर नागरने बुधवारी (२४ नोव्हेंबर) दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आई आणि मुलगी दोघींची प्रकृती व्यवस्थित आहे. नुपूरला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी नुपूर-भुवनेश्वर या दाम्पत्याला ही गोड बातमी मिळाली आहे.

भुवनेश्वर कुमारचा विवाह २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याची बालपणीची मैत्रीण नुपूरशी झाला होता. नुपूर सध्या नोएडा येथे राहत आहे. भुवनेश्वर बाप झाल्याची बातमी समोर आल्यानंतर या दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. या वर्षी भुवनेश्वरच्या कुटुंबाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. भुवनेश्वरच्या वडिलांचे याच वर्षी मे महिन्यात निधन झाले होते.

उपलब्ध माहितीनुसार, भुवनेश्वरची आई इंद्रेश आणि बहीण रेखा नुपूरसोबत हॉस्पिटलमध्ये आहेत. एमडीसीए (मेरठ जिल्हा क्रिकेट असोसिएशन) चे खजिनदार राकेश गोयल यांनी भुवनेश्वरला मुलगी झाल्याची गोड बातमी दिली. ते म्हणाले की, ‘भुवनेश्वर कुमार बुधवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका मुलीचा वडील बनला. कुटुंबापासून दूर असलेल्या भुवनेश्वरला फोनवरून ही आनंदाची बातमी देण्यात आली. हा वेगवान गोलंदाज गुरुवारपर्यंत त्याच्या मेरठ येथील निवासस्थानी पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.’

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेचा तो एक भाग होता. टीम इंडियाने ही मालिका ३-० ने जिंकली. किवीजविरुद्ध भुवनेश्वरची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भारताला मालिका जिंकून देण्यात त्याचा खारीचा वाटा होता. त्याआधी यूएईमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात भुवनेश्वरला आपली जादू दाखवता आली नाही. त्याने या मालिकेत ७.५ च्या इकॉनॉमी रेटने तीन बळी घेतले. भुवनेश्वरचे त्याच्या फॉर्ममध्ये पुनरागमन ही भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगली बातमी आहे. कारण अनेक महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धा एका पाठोपाठ एक येत आहेत. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीनेही भुवनेश्वरचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: