हरमनप्रीत कौरने घडवला इतिहास ; असा पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय क्रिकेटपटू


WBBL 2021 : सिडनी : भारताच्या महिला टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला बिग बॅश लीगच्या सातव्या सत्रात आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर इतिहास घडवला आहे. महिला बिग बॅश लीगमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार जिंकणारी हरमनप्रीत पहिली भारतीय ठरली आहे.
हरमनप्रीतची कामगिरी दमदार
हरमनप्रीतने चालू हंगामात मेलबर्न रेनेगेड्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. अष्टपैलू हरमनप्रीतने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये १३५.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या, तर गोलंदाजीत २०.४ च्या सरासरीने १५ विकेट्सही घेतल्या. तिने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडताना १८ षटकारही ठोकले आहेत. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर बिग बॅशमध्ये पुनरागमन करणाऱ्या हरमनप्रीतने सोफी डिव्हाईनला सलग तिसऱ्यांदा स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू होण्यापासून रोखले.

हरमनप्रीतला सर्वाधिक मते
प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी झालेल्या मतदानात हरमनप्रीत कौरला सर्वाधिक ३१ मते मिळाली. तिच्यापाठोपाठ बेथ मुनी आणि सोफी डेव्हाईन ज्या पर्थ स्कॉचर्सकडून खेळल्या, त्या प्रत्येकी २८ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिल्या. ब्रिस्बेन हीटकडून खेळणाऱ्या ग्रेस हॅरिसला २५ आणि जॉर्जिया रेडमायनला २४ मते मिळाली. गेल्या दोन मोसमात सोफी डिव्हाईनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आले. यावेळी हा पुरस्कार ३ मतांच्या फरकाने हुकला आहे.

या पुरस्कारासाठी दोन्ही मैदानी पंचांना प्रत्येक सामन्यात ३-२-१ अशा प्रकारे सामन्यातील तीन सर्वोत्तम खेळाडूंना मत देणे आवश्यक होते. एका सामन्यात खेळाडूला जास्तीत जास्त ६ मते मिळू शकतात. या जोरावर हरमनप्रीतने ११ सामन्यांत ३१ मते मिळवून बाजी मारली.

आजारपणामुळे हरमनप्रीत फलंदाजीपासून राहिली वंचित
नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने आजारपणामुळे फलंदाजी केली नाही. या सामन्यात तिच्या संघाचा ४३ धावांनी पराभव झाला. हरमनप्रीत गुरुवारी होणाऱ्या चॅलेंजर्स सामन्यात खेळेल, या सामन्यातील विजेत्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. आतापर्यंत हरमनप्रीतने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत छाप पाडली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: