खासगीकरणाच्या दिशेनं एसटीचं पाऊल; महामंडळानं घेतला ‘हा’ निर्णयम. टा. प्रतिनिधी,

एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला ‘वर्क ऑर्डर’ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, महामंडळाच्या मालकीची ‘शिवाई’ विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट ‘वर्क ऑर्डर’ देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असेही स्पष्ट झाले आहे.

वाचा:

खासगी कंपनीची बस व चालक आणि महामंडळाचा वाहक या तत्त्वावर विद्युत बस महामंडळात दाखल होणार आहेत. या विद्युत बससाठी महामंडळ प्रतिकिमीसाठी ५७ रुपये मोजणार आहे. बारा वर्षांसाठी या बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या बसवर एसटी महामंडळाचे बोधचिन्हही असणार आहे. कंत्राटी शिवशाहीला महामंडळाकडून इंधन पुरविण्यात येत होते. या विद्युत बससाठी चार्जिंग स्टेशन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे. यामुळे ही विद्युत बस प्रवाशांसह महामंडळाच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे, असा दावा महामंडळाचा आहे.

हैदराबाद स्थित ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, एसटी महामंडळाकडून वर्कऑर्डर मिळाली असून त्यानुसार काम सुरू केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. १०० विद्युत बस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. येत्या ३ महिन्यांत पहिली आणि डिसेंबर २०२२अखेर सर्व बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा:

शून्य गुंतवणुकीच्या माध्यमाने दादर-स्वारगेट, ठाणे – स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट या मार्गावर विद्युत बस चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई-पुणे हा मार्ग राज्यातील सर्वाधिक फायदेशीर मार्ग म्हणून ओळखला जातो. यामुळे एसटी संपाच्या काळात खासगी कंपनी आणि कंत्राटी शिवशाही-शिवनेरी मालकांनीही या मार्गाला पसंती दर्शवली आहे.

खासगी विद्युत बसची वैशिष्ट्ये

– १२ मीटर लांब

– वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन

– ३३ आसने + व्हीलचेयर + चालक अशी सोय आहे

-सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेअर, -मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्सSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: