Kranti Redkar: मलिक यांनी हायकोर्टाचे निर्देश डावलले?; क्रांती रेडकरचा ‘त्या’ ट्वीटवर आक्षेप


हायलाइट्स:

  • मी अशाप्रकारचं कोणतंही संभाषण कुणाशी केलेलं नाही.
  • नवाब मलिक यांच्या ट्वीटवर क्रांती रेडकरने घेतला आक्षेप.
  • मुंबई सायबर क्राइम सेलकडे केली मलिकांविरुद्ध तक्रार.

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालकसमीर वानखेडे यांच्याविरुद्ध बोलण्यास मंत्री नवाब मलिक यांना मनाई करता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने सोमवारी दिला. त्यानंतर मलिक यांनी मंगळवारी समीर यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्यावर निशाणा साधला. क्रांती हिचं मलिक यांच्याबाबतचं कथित चॅट मलिक यांनी ट्वीटरवर पोस्ट केलं असून त्यावर क्रांतीने जोरदार आक्षेप घेतला आहे. क्रांतीने याबाबत मलिक यांच्याविरुद्ध मुंबई सायबर क्राइम सेलकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. ( Kranti Redkar Files Complaint Against Nawab Malik )

वाचा: वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच; मलिक यांना दिले हे निर्देश

कॅप्टन जॅक स्पॅरो नामक एक व्यक्ती आणि क्रांती रेडकर यांच्यातील कथित चॅटचे दोन स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. ‘ओह… माय गॉड! काय जोक आहे! आज सकाळीच मला हे मिळालं. एन्जॉय,’ असे नमूद करत मलिक यांनी ट्वीटरवर या दोन पोस्ट टाकल्या आहेत. नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील कनेक्शनचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत, असे कॅप्टन जॅक स्पॅरो ही व्यक्ती सांगत आहे, त्यावर काय पुरावे आहेत, प्लीज मला पाठवा, तुम्हाला त्याबदल्यात बक्षीस मिळेल, असे क्रांती सांगत आहे. माझ्याकडे दाऊद आणि मलिक यांचा फोटो असल्याचे सांगून या व्यक्तीने राज बब्बर आणि मलिक यांचा फोटो टाकला. त्यावर हे तर राज बब्बर आहेत, असे क्रांती म्हणाली असता ‘हो, राज बब्बर यांची पत्नी त्यांना प्रेमाने दाऊद म्हणते’, असे समोरची व्यक्ती सांगते. हे चॅट मलिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यानंतर क्रांती रेडकरने त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

वाचा:एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी ऑफर; संप उद्या मिटण्याची शक्यता!

रेडकरने याप्रकरणी मुंबई सायबर क्राइम पोलिसांकडे नवाब मलिक यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. ही तक्रार ऑनलाइन करण्यात आली आहे. याबाबत क्रांतीने ट्वीटही केले आहे. मलिक यांनी ज्या चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत ते फेक आहेत. कुणीतरी खोडसाळपणा करून या इमेज बनवल्या आहेत. अशाप्रकारचं कोणतंही संभाषण मी आजतगायत कुणाशी केलेलं नाही. असे असताना कोणतीही खातरजमा न करता मलिक यांनी या पोस्ट केल्या आहेत. हे पुन्हा त्यांच्याकडून घडलं आहे. याबाबत मी मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दिली आहे. या लढाईत जे आमच्यासोबत आहेत त्यांनी निश्चिंत राहावे. हा जो काही आरोप लावला गेला आहे तशी आमची संस्कृती नाही, अशी भाषाही आमच्या आचरणात नाही, असे क्रांतीने नमूद केले.

वाचा:मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोकल पास व तिकिटाबाबत मोठा निर्णय

दरम्यान, नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध बोलण्यास मनाई करता येणार नाही, असे स्पष्ट करताना हायकोर्टाने मलिक यांनाही निर्देश दिले आहेत. सार्वजनिक स्तरावर काहीही मांडायचे असल्यास मलिक यांनी किमान वाजवी पद्धतीने खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी खातरजमा करूनच बोलावे आणि सोशल मीडियावर पोस्ट करावे, असे कोर्टाने नमूद केले आहे. त्यावरच बोट ठेवत क्रांती रेडकरने मलिक यांच्या ताज्या ट्वीटवर हरकत घेतली आहे.

वाचा:कंगना राणावत पुन्हा गोत्यात; खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: