भारताने न्यूझीलंडचा विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला, सामन्यासह मालिका ३-० ने सहजपणे जिंकली…


कोलकाता : रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. रोहितच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढए विजयासाठी १८५ धावांचे अव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला सुरुवातीलाच अक्षर पटेलने तीन धक्के दिले आणि त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने यावेळी ७३ धावांनी विजय साकारला आणि मालिका ३-० अशी खिशात टाकली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला अक्षरने तिसऱ्या षटकात दुहेरी धक्के दिले. अक्षरने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर डॅरिल मिचेलला बाद केले, मिचेलला यावेळी पाच धावा करता आल्या. अक्षरने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मार्क चॅम्पमनला बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मार्कला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. अक्षरने त्यानंतर पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलीप्सला शून्यावर बाद केले. एका बाजूने या विकेट्स पडत असताना सलामीवीर मार्टिन गप्तील मात्र दमदार फलंदाजी करत होता. गप्तिलने यावेळी आपले अर्धशतकही झळकावले. पण युजवेंद्र चहलने गप्तिलला ५१ धावांवर बाद केले आणि त्यावेळीच न्यूझीलंडचा पराभव साफपणे दिसायला लागला. त्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज जास्त काळ टिकाव धरू शकला नाही आणि भारताने मोठा विजय साकारला.

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही नाणेफेकीचा कौल यावेळी रोहित शर्माच्याच बाजूने लागल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली होती, पण आजच्या सामन्यात मात्र रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहित आणि या सामन्यात संघात स्थान मिळवलेल्या इशान किशनने भारताला झोकात सुरुवात करून दिली. रोहित आणि इशान यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये तर न्यूझीलंडच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये रोहित आणि इशान यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला १०च्या धावगतीने धावा जमवून दिल्या होत्या. पण सातव्या षटकात भारताला इशानच्या रुपात पहिला धक्का बसला. न्यूझीलंडसाठी आजच्या सामन्यात कर्णधार असलेल्या मिचेल सँटनरने इशानला बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. इशानने यावेळी २१ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर २९ धावांची खेळी साकारली. इशान बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (०) आणि रिषभ पंत (४) हे लवकर बाद झाले आणि भारताचा डाव अडचणीत आल्यासारखे वाटत होते. पण यावेळी रोहितने भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. रोहितने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला, त्याचबरोबर रोहितने यावेळी आपले अर्धशतक चौकारासह पूर्ण केले. रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. पण अर्धशतक झळकावल्यावर रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. न्यूझीलंडचा फिरकीपटू इशा सोधीने यावेळी रोहितला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. रोहितने यावेळी ३१ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर वेंकटेश अय्यर फलंदाजीला आला आणि त्याला फक्त २० धावांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर विश्वासू श्रेयस अय्यरलाही २५ धावा करता आल्या.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: