पगाराच्या वादातून मालकाच्या मुलाचे अपहरण


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

चेंबूरच्या एका व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या मजुराने मालकाच्याच चार वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना कुर्ला नेहरूनगर येथे घडली. मुलाला नाशिकला घेऊन पळालेल्या या मजुराला पोलिसांनी १२ तासांत शोधून त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली आहे. काम सोडल्यानंतर पुरेसा मोबदला न दिल्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

इंद्रचंद्र बालोटिया हे व्यावसायिक चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत आपल्या कटुंबीयांसोबत राहतात. रामपाल तिवारी हा तरुण बालोटिया यांच्याकडे कामाला होता. वारंवार समजावूनही रामपाल दारू पिऊन कामावर येत असल्यामुळे इंद्रचंद्र यांनी त्याला कामावरून काढले. सोमवारी पगाराचे पैसे मागण्यासाठी तो इंद्रचंद्र यांच्याकडे आला होता. इंद्रचंद्र यांनी त्याला पगाराचे पैसे दिले; मात्र त्याने आणखी ५० हजार रुपयांची मागणी केली. बालोटिया यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर रामपाल तेथून निघून गेला आणि सायंकाळी दारू पिऊन पुन्हा आला. जवळपास कुणी नसल्याचे पाहून त्याने बालोटिया यांच्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. मुलगा दिसत नसल्याने बालोटिया यांनी आजुबाजूचा परिसर पिंजून काढला. त्याचवेळी रामपाल मुलाला घेऊन गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितल्यावर त्यांनी नेहरूनगर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला व त्याची सुखरूप सुटका केली.

नाशिक पोलिसांचीही तातडीची कारवाई

रामपाल याच्या मोबाइलवर संपर्क केला असता कुर्ला परिसरात आहे, असे सांगून त्याने मोबाइल बंद केला. रामपालच्या मोबाइलच्या लोकेशनचा माग काढत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन हॉटेल, लॉजची तपासणी केली; मात्र तो सापडला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून तो नाशिकला पोहोचल्याचे समजले. नेहरूनगर पोलिसांनी विलंब न करता नाशिक रोड पोलिसांशी संपर्क करून रामपाल आणि मुलाचा फोटो त्यांना पाठवला. नाशिक पोलिसांनी रामपाल याला ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका केली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: