एसटी संप: ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय


हायलाइट्स:

  • एसटी कामगारांचा संप सुरूच, लोकांचे हाल
  • भारतीय जनता पक्षाची ठाकरे सरकारवर टीका
  • येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालायसमोर आंदोलनाची घोषणा

मुंबई: ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कामगारांच्या संपावर (MSRTC Workers Strike) कुठलाही तोडगा निघताना दिसत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा मनाई आदेश धुडकावून कामगारांनी संप सुरू ठेवला आहे. त्यामुळं लोकांचे हाल होत आहेत. या मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष भाजपनं सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे. एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी भाजपनं येत्या १० नोव्हेंबर रोजी मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे. राज्यातील ठाकरे सरकारवर पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. ‘गेल्या काही दिवसांत २८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही या सरकारचा अबोला सुटत नाही. आत्महत्या केलेल्या कामगारांच्या दारात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसणं सोडाच, दोन ओळीचं सांत्वन पत्र देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेलं नाही. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि तो संकटात आल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडायचं हाच यांचा मराठी बाणा आहे,’ असा बोचरा टोला पडळकर यांनी हाणला आहे.

वाचा: एसटीचा संप का चिघळला?; शरद पवार म्हणाले, काही लोकांनी…

‘एसटी कामगारांना उघड्यावरच आणायचं असंच सरकारनं ठरवलं असेल तर आम्हीही शांत बसणार नाही. येत्या १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या प्रांगणात आंदोलन केलं जाईल, अशी घोषणा पडळकर यांनी केली आहे. ‘तमाम एसटी कामगारांनी आपल्या पोराबाळांसह मंत्रालयाच्या प्रांगणात यावं, आपण तिथंच उघड्यावर संसार मांडू, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लोकशाही मार्गानं करू आणि जिंकू. या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये याची जबाबदारी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यायची आहे. आता आत्महत्येचं पाऊल उचलायचं नाही. आता लढायचं आहे आणि लढण्यासाठी जगायचं आहे,’ असंही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: