Nawab Malik: नवाब मलिक यांचे हल्ले थांबेनात; आज नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता!


हायलाइट्स:

  • नवाब मलिक आज पुन्हा घेणार पत्रकार परिषद.
  • नवा कोणता धमाका करणार याकडे सर्वांचे लक्ष.
  • फडणवीसांवरील आरोपांमुळे राजकारण तापलं.

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यानंतर फडणवीस यांनीही प्रतिआव्हान देत, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार, असा इशारा दिला असतानाच मलिक हे मंगळवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आहेत. ( Nawab Malik Press Conference Updates )

वाचा: आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींचे डील?; सॅम डिसूझाने केला मोठा गोप्यस्फोट

शिवसेना-भाजप युती तुटली व राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर आरोपांचे साखळी हल्ले केले होते. राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेतृत्वावर निशाणा साधायचे. देशभर त्याची चर्चा व्हायची. त्याचाच अवलंब सध्या नवाब मलिक यांनी केल्याचे दिसत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर मलिक हे गेले काही दिवस दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीने क्रूझवर केलेली कारवाई, एनसीबीची एकंदर कार्यपद्धती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करत आहेत. त्यात सोमवारी मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला.

वाचा: आर्यन खान प्रकरणात नवा धमाका; सॅम डिसूझाने ‘ही’ नावे केली उघड

नदी वाचवा अभियानांतर्गत एक रिव्हर अँथम प्रदर्शित करण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एका संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला गेला होता. हे अँथम अमृता फडणवीस आणि सोनू निगमने गायले होते. या अँथमचा फायनान्स हेड जयदीप चंदूलाल राणा हा होता. हाच जयदीप राणा ड्रग तस्करी प्रकरणी सध्या अटकेत असून साबरमती कारागृहात आहे. एका राजकीय विश्लेषकाने दिलेल्या या माहितीवर बोट ठेवत मलिक यांनी थेट फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्जचा धंदा चालला आहे, असे गंभीर आरोप मलिक यांनी केले. त्यानंतर फडणवीस यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत मलिक यांचे आरोप फेटाळले व प्रतिआरोप केले. मलिक यांचा लवंगी फटाका होता, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार आहे, असा थेट इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. हे आव्हान मलिक यांनीही स्वीकारले असून फडणवीस यांना टॅग करत ‘है तैयार हम’, असे ट्वीट मलिक यांनी केले आहे. त्यानंतर आता मंगळवारी सकाळी ९ वाजता मलिक हे कुर्ला येथे पत्रकार परिषद घेणार असून ते कोणता नवा धमाका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा:‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समीर वानखेडेंची बदली झाली’Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: