लोकल तिकीट बंद?; राज्य सरकारच्या सूचनेमध्ये केवळ पासचा उल्लेख


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह करोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल अर्थात सार्वत्रिक पास आवश्यक असणार आहे. या प्रवाशांना सर्व प्रकारचे पास देण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. मात्र सामान्य तिकिटांबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने आज, बुधवारपासून अत्यावश्यक प्रवाशांनाही तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे. परिणामी पुढील सूचनेपर्यंत लोकल प्रवासासाठी सर्व प्रवाशांना पासचाच पर्याय असेल.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकल तिकीट व पास आणि लसधारक प्रवाशांना केवळ मासिक पास घेऊन लोकल प्रवासाची मुभा होती. दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याने लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंगळवारी रेल्वे प्रवासासाठी सुधारित आदेश काढले. लोकल मधून प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती. आता यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास असलेल्यांनाच सर्व प्रकारचे पास देण्यात येतील. लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पास देण्यात येईल, असे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने काढलेल्या आदेशात एका लोकल प्रवासासाठी तिकीट द्यावे की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पास निर्बंध शिथिल करून त्रैमासिक आणि सहामाही पास उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत.

अत्यावश्यक सेवेकरींबाबत चर्चा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकीट द्यायचे की नाही, याबाबत राज्य सरकारमधील संबंधित विभागाशी बोलणी सुरू असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल. तूर्तास राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांना सर्व पासच्या आधारे लोकल प्रवासाची मुभा आहे, असे मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एकूण पासधारक (११ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर)

मध्य रेल्वे : १७,३०,०१०

पश्चिम रेल्वे : ८,१५,३१०

(तिकीटधारकांचा यामध्ये समावेश नाही.)Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: