‘तो’ अपघात नव्हता! १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर काय घडलं? पोलीस तपासातून धक्कादायक सत्य उजेडात


बंडू येवलेलोणावळा

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पोला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेबाबत शंका उद्भवल्याने सखोल चौकशी केली असता हा अपघात नसून घातपात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीला अनैतिक संबधातून क्रूरपणे जाळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

सदाशिव संभाजी चिकाळे (रा. पुनावळे, मुळशी, पुणे) असे अनैतिक संबधातून क्रूरपणे जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल जवळील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर १२ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला आग लागून लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला होता. आग आटोक्यात आणल्यानंतर लक्षात आले की, टेम्पोच्या केबिनमध्ये एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. त्या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून गाडीच्या मालकाचा शोध घेत आगीत होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटविली असता, तो सदाशिव संभाजी चिकाळे असल्याचे समजले. याबाबत सदाशिव चिकाळे यांच्या कुटुंबीयांना कळविले असता त्यांनी या घटनेवर संशय व्यक्त करत हा अपघात नसून, घातपात असल्याचे सांगितले. सदाशिवचे एका व्यक्तीशी भांडण असल्याची माहिती त्यांनी दिली. सदाशिवच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. सदर मार्गावरील घटनास्थळापर्यंतच्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित कार त्या टेम्पोचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. त्या रात्री सदाशिव भिवंडीमधून टेम्पोमध्ये माल घेऊन पुण्याकडे निघाला होता हे निष्पन्न झाले.

वाचा: पुण्यात भर दुपारी गोळीबाराचा थरार; प्रचंड घबराट, काही क्षणांत दुकानं झाली बंद

या प्रकरणाच्या तपासासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगे, राहुल भडाळे यांची दोन पथके तयार केली होती. त्यानुसार सदाशिवच्या घरच्यांनी ज्याच्यावर संशय व्यक्त केला होता, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले होते. मात्र ती व्यक्ती अपघाताच्या घटनेनंतर गायब असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइल लोकेशननुसार माग काढत त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला देहूमधून अटक केली. या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता त्यातील एकाला ताब्यात घेण्यात यश आले असून, एक जण अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास केला असता सदर खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे उघडकीस आले.

मयत सदाशिव सोबत आपल्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यावरून या दोघांमध्ये भांडणही झाले होते. त्यामुळे संशयित आरोपीने सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले होते. त्यासाठी तो सदाशिववर पाळत ठेवून होता. १२ ऑक्टोबरला सदाशिव भिवंडीहून पुण्याकडे टेम्पो घेऊन गेला असल्याचे समजल्याने त्याने दोन साथीदारांना बरोबर घेऊन कारने सदाशिवचा पाठलाग केला. पनवेल जवळील कळंबोली येथे आल्यावर एक्स्प्रेस वेवर त्यांनी सदाशिवच्या टेम्पोच्या मागे येऊन रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्यांची कार सदाशिवच्या टेम्पोला आडवी घालून त्याला टेम्पो बाजूला घ्यायला लावले. त्यानंतर सदाशिवला केबिनमध्येच बेदम मारहाण करून बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पोला आग लावून तिघे तेथून पसार झाले होते.

अखेर रसायनी पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस करीत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: