Pravin Mankar Bribery Case: पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!


हायलाइट्स:

  • पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड.
  • पुण्यातील घराच्या झडतीत बिंग फुटले.
  • अहमदनगर महापालिकेत मोठी खळबळ.

अहमदनगर : लाच प्रकरणी अटक करण्यात आलेले अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२) यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. कंत्राटदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात लाच लुपचपत प्रतिबंधक पथकाने मानकर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने आरोपीच्या पुण्यातील विश्रांतवाडी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी घरात ११ लाख, ५० हजारांची रोकड, ५४० ग्रॅम सोने, दीड किलो चांदी आढळली. ही संपत्ती कोठून आली, याचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली. मानकर यांच्या पुण्यातील तीन फ्लॅटची कागदपत्रे आढळून आली आहेत. त्याबाबत तपास सुरू आहे. ( Pravin Mankar Bribery Case Updates )

वाचा: संजय राऊतांचं थेट सोमय्यांना पत्र!; ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आणि…

आरोपी मानकर नगरला महापालिकेत मुख्य लेखाधिकारी आहेत. कंत्राटदारांची बिले मंजूर करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. दोघा कंत्राटदारांची कामांची बिले मंजूर करून त्यांना चेक दिल्याच्या बदल्यात मानकर यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, नंतर १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणीसाठी सापळा लावला. आरोपीने लाच स्वीकारली नसली तरी मागणी केल्याचे त्यात निष्पन्न झाल्याने २० ऑक्टोबरला तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

वाचा: ‘समीर वानखेडेंची नोकरी घालवणार, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही’

आरोपीला अटक केल्यावर पथकाने उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे येथील मानकर यांच्या घरी झडती घेतली. त्यामध्ये कोट्यवधींचे घबाड आढळून आले आहे. ही संपत्ती कोठून आली, याची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे या करीत आहेत. मानकर हे नगरच्या दिल्लीगेट भागातील रहिवाशी असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. कंत्राटदाराकडून केवळ पंधरा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ते सापळ्यात अडकले. असे असले तरी त्यांच्याकडे मोठी संपत्ती आढळून आल्याने महापालिकेच्या एकूण कारभाराबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर; ‘हे’ असेल आव्हानSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: