शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना धक्का; ED चौकशीविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली


मुंबई: शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना दुसरा धक्का बसला आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं सुरू केलेल्या चौकशीविरोधात अडसूळ यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळं आता अडसूळ यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीनं अडसूळ यांच्या मुंबई व अमरावती येथील घरी छापे टाकले होते. तसंच, चौकशीसाठी ईडीनं अडसूळ यांना समन्स बजावलं होतं. मात्र, तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. दरम्यानच्या काळात अडसूळ यांनी ईडीच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ईडीनं पाठवलेलं समन्स रद्द केलं जावं, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, ही अडसूळ यांची विनंती कोर्टानं फेटाळली. तसंच, मुंबई सेशन्स कोर्टात रीतसर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना अडसूळ यांना केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी हजारो खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेच्या खातेदारांमध्ये गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा यांचा समावेश आहे. यातील ९० टक्के खातेदार मराठी आहेत. अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेऊन बिल्डरांना नियमबाह्य कर्ज दिलं. त्यामुळं बँक बुडाली असून यात जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात सध्या अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: