भारतीय फुटबॉल संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची निवड


कोल्हापूर: भारतीय २३ वयोगट फुटबॉल संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची निवड झाली आहे. अनिकेत फॉरवर्ड पोझिशनवर खेळणार असून यापूर्वी भारतात झालेल्या १७ वयोगट विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तो भारतीय संघाचा कर्णधार होता.

उझबेकीस्तानला पुढील वर्षी २०२२ मध्ये अशियाई चषक फुटबॉल स्पर्धा (ए एफ सी) होणार असून या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी सामने खेळवण्यात येत आहेत. भारतीय संघाचा ई गटात समावेश असून या गटात भारताला ओमान, किरगीज रिपब्लिक, आणि यजमान युएई बरोबर खेळावे लागणार आहे. २८ जणांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून आघाडीफळीत अनिकेत जाधव याच्यासह विक्रम प्रताप सिंग, रहिम अली, रोहित दानू यांची निवड झाली आहे. आयएसल (इंडियन सॉकर लिग) मध्ये अनिकेत यावर्षी हैद्राबाद एफसीकडून खेळणार आहे. यापूर्वी त्याने जमशेटपूर एफसी, इंडियन अॅरो, पूणा एफसी या संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे.

युएई मधील फुजीराह स्टेडियमवर २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सामने होणार आहेत. २५ तारखेला भारताचा पहिला सामना ओमान बरोबर, दुसरा २८ ला युएई तर तिसरा ३१ ऑक्टोबर रोजी किरगीज रिपब्लिकन बरोबर होणार आहे. भारतीय संघातील निवडीबद्दल अनिकेतने अशी प्रतिक्रिया दिली, ‘२०१९ नंतर मला आता पुन्हा भारताची जर्सी घालायला मिळणार आहे याचा मला खूप आनंद होत आहे. या निवडीसाठी मी दोन वर्षे खूप मेहनत घेतली आहे. मी चांगला खेळ करुन सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करेन’. माझ्या संपूर्ण प्रवासात विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, आमदार ऋतुराज पाटील, प्रशिक्षक जयदीप अंगिरवाल यांचे सहकार्य लाभल्याचे त्याने सांगितले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: