एक दिवस आधी रेकी; अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर


म. टा. प्रतिनिधी, पुणे: एकतर्फी प्रेमातून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचा बिबवेवाडी पोलिसांनी बारा तासांतच छडा लावला आहे. बिबवेवाडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपीही पोलिसांपुढे हजर झाला आहे. आरोपी पूर्ण तयारीनिशी आणि नियोजन करून खून करण्याच्या उद्देशानेच आले होते, असे प्राथमिक तपासात आणि परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपी शुभम बाजीराव भागवत (वय २१) हा पिंपरी-चिंचवड हद्दीत स्नॅक्स सेंटर चालवित होता. अन्य आरोपींपैकी दोघे जण शुभमकडे कामाला होते, तर, एक जण त्याचा मित्र असून, तो बिबवेवाडी परिसरातच राहतो. शुभम आणि त्याचा साथीदार चिंचवड येथून दुचाकीवर बिबवेवाडीला आले होते. अन्य दोघे जण कॅबने आले. कॅबने आलेल्यांकडील बॅगेत त्यांनी हत्यारे ठेवली होती. बिबवेवाडी येथे सर्व जण भेटले. सायंकाळी तिघेजण दुचाकीवरून यश लॉन्सकडे गेले. एक जण मुख्य रस्त्यावरच थांबला होता. आरोपींनी ठरल्यानुसार संबंधित मुलीला तेथे गाठून सुरा आणि कोयत्याने ४४ वार करून तिचा खून केला, अशी माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली.

एक दिवस आधी ‘रेकी’

आरोपींनी घटनेच्या एक दिवस आधी यश लॉन्स परिसराची ‘रेकी’ केली होती. संबंधित मुलगी किती वाजता सरावासाठी येते, तेथे कोण कोण असते, आपल्याला काय तयारी करावी लागेल, याची सर्व ‘रेकी’ आरोपींनी केली होती. त्या वेळी मुलीसह तिच्या मैत्रिणी आणि काही व्यक्ती असल्याचे आढळून आले होते. तसेच, त्या परिसरात सायंकाळी गर्दी देखील होती. त्यामुळे प्रत्यक्ष हल्ला करताना मुलीच्या मैत्रिणी किंवा तेथील नागरिकांना प्रतिकार केला, तर त्यांना प्रत्युत्तर देता आले पाहिजे या उद्देशाने आरोपी शस्त्रसज्ज होऊन आले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

नजर ठेवण्यासाठी दिले तीन हजार

आरोपी शुभम याने दोन ते तीन दिवस संबंधित मुलीवर नजर ठेवण्यासाठी अप्पर येथील एका मुलाला सांगितले होते. त्यासाठी त्याला तीन हजार रुपये द्यायचे ठरले होते. त्या मुलाने ती मुलगी यश लॉन्सला किती वाजता येते, सोबत कोण असते, याची माहिती आरोपीला दिली.

पहिला प्रयत्न फसला

यश लॉन्स परिसरात बिबवेवाडी पोलिसांकडून नेहमी गस्त घालण्यात येते. तेथे आरोपींनी मुलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी पोलिसांची गाडी त्यांना दिसली. एका मुलाची नजर ठेवण्यासाठी त्याने नेमणूक केली होती. त्यानंतर पोलिस गेल्याचे समजताच तिघे दुचाकीवरून तेथे आले आणि मुलीवर वार करून तिचा खून केला. मुलगी गतप्राण झाल्यानंतरही शुभमने तिच्यावर वार करणे थांबवले नाही. त्यानंतर तिघांनी तेथून पळ काढला. शुभमचा गाडी चालवणारा साथीदारही पळून गेला.

‘मी खून केलाय’

खून केल्यानंतर शुभम घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा रात्रभर शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. बुधवारी सकाळी शुभम भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथे त्याने पोलिस अधिकाऱ्यांना ‘मी खून केला आहे,’ असे सांगितले. त्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी सर्व माहिती घेऊन बिबवेवाडी पोलिसांना आरोपीची माहिती दिली.

बिबवेवाडीत गुन्हेगारीत वाढ

सराईत गुन्हेगाराचा खून, सराईताचा शस्त्र घेऊन वाढदिवस, रस्त्यावर खून, मारामारी असे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत आहेत. प्रत्येक वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा वचक नसल्याची चर्चा सुरू आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टीचा भाग येतो. त्यामुळे हद्दीत फिरून गस्त घालून खबरी गोळा करण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, त्यामध्ये ते कमी पडत आहेत.

मुख्य आरोपीसह अन्य तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून, न्यायालयात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न आहे.

– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणेSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: