‘ती’ माहिती द्यायला सावरकर हे राजनाथ सिंहांच्या स्वप्नात आले होते का?; काँग्रेसची बोचरी टीका


हायलाइट्स:

  • गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती – राजनाथ सिंह
  • राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला काँग्रेसचा तीव्र आक्षेप
  • राजनाथ सिंह यांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याकडं लक्ष द्यावं – काँग्रेस

मुंबई: ‘विनायक दामोदर सावरकर (VD Savarkar) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे वक्तव्य धादांत खोटे व दिशाभूल करणारे आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांना इतिहासाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करण्याची विकृती असून सावरकरांबाबत केलेले हे विधानही त्याच पद्धतीचे आहे. सावरकर यांनी राजनाथ सिंह यांना स्वप्नात येऊन ब्रिटिशांना माफीनामा का दिला हे सांगितले होते का?,’ असा बोचरा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

वाचा: एनसीबीकडून आर्यन खानवर पुराव्यांशिवाय आरोप- वकिलांचा दावा

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा लोंढे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘सावरकर व महात्मा गांधी यांचे वैचारिक मतभेद होते. दोघांच्या विचारात जमीन अस्मानाचे अंतर आहे. सावरकर यांनी जेलमधून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे अनेकवेळा माफीनामे सादर केले होते हे सर्वश्रुत आहे. सावरकरांची १९११ साली अंदमानच्या जेलमध्ये रवानगी केली होती, जेलमध्ये गेल्यानंतर सहा महिन्यांतच सावरकर यांनी ब्रिटिशांना पहिला माफीनामा पाठवला होता. दुसरा माफिनामा १४ नोव्हेंबर १९१३ साली पाठवला, त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून ९ जानेवारी १९१५ रोजी भारतात आले. यावरून महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून माफीनामा सादर केला हे राजनाथसिंह यांचे विधान कपोलकल्पित व हास्यापद वाटते. महात्मा गांधी यांच्याबद्दल भाजप व आरएसएसचे विचार किती विकृत आहेत हे जगाला माहीत आहे. राजनाथसिंह यांनीही संघाच्या शिकवणीप्रमाणे असत्य विधान करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा आरोप लोंढे यांनी केला.

वाचा: जळगावात राजकारण फिरलं! महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात, नेमकं काय घडलं?

‘राजनाथसिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, परंतु संरक्षणाच्या संदर्भात ते फारसे कधी बोलल्याचं दिसत नाही. चीननं भारतीय सीमेत घुसखोरी करून आपली जमीन बळकावली आहे. सीमेवर पाकिस्तान दररोज कुरापाती करत आहे. आपल्या सैनिकांचा नाहक बळी जात आहे. परंतु संरक्षणमंत्री त्यावर कधी बोलले नाहीत. खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा राजनाथ सिंह यांनी देशाच्या सीमा सुरक्षित राहतील व शत्रूराष्ट्राला भारताची दहशत वाटेल. चीन, पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेनेही पाहण्याची हिंमत करणार नाही याकडे लक्ष द्यावे, असंही लोंढे यांनी सुनावलं.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: